अशीही दुहेरी भूमिका

Marathi Actress

सिनेमा, नाटक इतकंच काय मालिकांमध्येदेखील आपण कलाकारांना दुहेरी भूमिकेमध्ये पाहात असतो. एक कमालीचा सज्जन तर दुसरा टोकाचा वाईट असे दाखवत डबल रोल करणारे कलाकार आपण यापूर्वी अनेक सिनेमा, मालिकांमध्ये पाहिलेले आहेत. लहानपणी दुरावलेली भावंडे मोठेपणी कुठली तरी खूण घेऊन एकत्र येतात हे पाहण्यात एक वेगळीच मजा असते. सध्या काही मालिकांमध्ये अशा दुहेरी भूमिका करणारे कलाकार आपल्याला दिसत आहेत. मात्र ही दुहेरी भूमिका असली तरी व्यक्तिरेखा वेगळ्या आहेत आणि कलाकार मात्र तेच आहेत.

आपल्या आवडत्या कलाकारांची ही दुहेरी रूपं चाहत्यांना खूप आवडत असल्याचे दिसून येत आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar), किशोरी अंबिये (Kishori Ambiye), शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale), मुग्धा गोडबोले (Mugdha Godbole), अभिनेता अद्वैत दादरकर ही मंडळी सध्या एकाच वेळी दोन वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करून दोन वेगळ्या व्यक्तिरेखा म्हणून त्यांच्या चाहत्यांना ऑनस्क्रीन भेटत आहेत. एकाच वेळी दोन चेहरे, दोन व्यक्तिरेखांचे जग चाहत्यांसमोर मांडत असताना या कलाकारांना अभिनयाचा कस लावावा लागतो. कलाकार हे त्यांच्या व्यक्तिरेखांमुळे लोकप्रिय होत असतात. त्यामुळे साहजिकच कलाकार एक मालिका करत असताना दुसरी मालिका सहसा करत नाहीत. कारण ते मालिकेतील पात्र म्हणून लोकप्रिय होत असतात.

घराघरांत पोहचत असतात. पण आता या संकल्पनेला गेल्या काही दिवसांमध्ये छेद देत कलाकार एकाच वेळी दोन मालिकांमध्ये काम करत आहेत आणि तशी परवानगीदेखील त्या मालिकेच्या निर्मिती टीमकडून त्यांना मिळत आहे. स्वामिनी या मालिकेमध्ये गोपिकाबाई ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ही ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेत अरुणा ही व्यक्तिरेखाही साकारत आहे. ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेचा पहिला प्रोमो टीव्हीवर झळकला तेव्हा त्यामध्ये ऐश्वर्याचा चेहरा पाहून अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यातली पहिली चर्चा होती की, ऐश्वर्या नव्या मालिकेत दिसणार असेल तर ती ‘स्वामिनी’ या मालिकेला निरोप देणार आहे का? इतकंच नव्हे तर गोपिकाबाई भूमिकेला ऐश्वर्याचा रामराम अशा बातम्यादेखील इंडस्ट्रीमध्ये पसरल्या होत्या. मात्र या दोन्ही मालिका सुरू असून त्यामध्ये ऐश्वर्या नारकर काम करत आहे. स्वामिनीमध्ये गोपिका तर ‘श्रीमंता घरची सून’मध्ये अरुणा या दोन्ही भूमिकांमधील वेगळेपण जपत ऐश्वर्याने तिच्याविषयी सुरू असलेल्या चर्चांना समर्पक उत्तर दिलं. स्वामिनीमधील गोपिका प्रचंड रूक्ष आणि कपटी तर श्रीमंता घरची सून या मालिकेतील अरुणा ही सर्वांची काळजी घेणारी एक गृहिणी अशी ही भूमिका आहे. या दोन्ही भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे करून ऐश्वर्याने एक अभिनेत्री म्हणून तिचं कौशल्य दाखवून दिलं आहे.

किशोरी अंबियेने अभिनयाची सुरुवात एकांकिका, नाटक यापासून केली तर अनेक मालिकांमध्ये किशोरी अंबियेने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनायाच्या आईच्या भूमिकेत चपखल बसलेली किशोरी सर्वांची लाडकी झाली आहे. या रोलमधील विनोदी टचसुद्धा किशोरीने अत्यंत चांगल्या प्रकारे निभावला आहे. अनेक कॉमेडी शोमध्ये किशोरीने यापूर्वी भाग घेतल्यामुळे ही भूमिका करायला तिला फार कष्ट पडले नाहीत. तर ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील किशोरीने रंगवलेली मामी ही भूमिका थोडीशी खलनायिका असलेली आहे. इतरांचं चांगलं झालेलं न बघवणारी मामी किशोरीने उत्तम साकारली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधली विनोदी रंगाची मम्मा आणि ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमधील खलनायिका या दोन्ही भूमिकांनी तिने तिच्या चाहत्यांना खूश केले आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचा प्रोमो सध्या टीव्हीवर झळकत आहे.

या मालिकेमध्ये शुभांगी गोखले सासूची भूमिका करणार आहेत. सध्या शुभांगी गोखले ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत कडक शिस्तीच्या सासूबाई कुसुमावती ही भूमिका रेखाटत आहेत. पण नव्या मालिकेच्या प्रोमोतून तरी असं दिसतंय की, या मालिकेतील शुभांगी रेखाटत असलेल्या सासूबाई सुनेला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी शुभांगी गोखले यांच्या रूपाने दोन वेगवेगळ्या सासूबाईंची रूपं पाहायला मिळणार आहेत. सध्या तरी ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेचे १०० भाग झाले असून अतिशय रंजक वळणावर ही मालिका आल्यामुळे या मालिकेतून शुभांगी गोखले बाहेर न पडता एकाच वेळी त्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतही काम सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेत अनन्याच्या आईच्या इरावतीच्या भूमिकेत दिसत असलेली मुग्धा गोडबोले ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत डॉक्टरच्या भूमिकेत आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ती व्यक्तिरेखा जास्त लांबीची जरी नसली तरी मुग्धा दोन मालिकांमध्ये दुहेरी भूमिका करत आहे. अद्वैत दादरकर हा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत सौमित्र म्हणून तुफान लोकप्रिय झाला आहे. खरं तर वाइल्ड कार्ड एन्ट्रीप्रमाणे या मालिकेत मध्येच त्याची एन्ट्री झाली; पण त्याने रंगवलेला सौमित्र भाव खाऊन जात आहे. ही मालिका करत असतानाच अद्वैत, ‘दादा एक गुड न्यूज’ या नाटकाचे दिग्दर्शनही करत होता आणि सध्या ‘वजनदार डान्सिंग क्वीन’ या शोचे निवेदनही तो करत आहे. खरं तर डबल रोल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो एकाच कलाकाराने जुळ्या भावांचा किंवा एका अभिनेत्रीने जुळ्या बहिणींचा केलेला रोल. पण आजचे हे कलाकार दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत दुहेरी भूमिका जगत आहेत आणि चाहत्यांना डबल ट्रीट देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER