४८ टन मौल्यवान अडगळीचा असाही पूल…

४८ टन मौल्यवान अडगळीचा असाही पूल...

Shailendra Paranjapeदिवाळी (Diwali) आली आणि गेली पण दिवाळीच्या निमित्ताने घरात करण्यात आलेली आवराआवरी तसंच करोनाचं तुलनेनं कमी झालेलं सावट, यामुळे घराघरातलं वातावरण बदललं होतं. दिवाळी हा पहिलाच सण लोकांनी सार्वजनिक पातळीवरही साजरा केलेला करोना (Corona) लॉकडाऊननंतरचा (Lockdown) पहिला सण. त्यामुळे सारे निर्बंध पाळूनही फटाक्यांचे आवाज ऐकू आलेच आणि लहानग्यांना कडेवर घेऊन उडवलेल्या फुरबाज्यांचे व्हिडियोही सोशल मिडियावरून फिरले.

दरवर्षी श्रावणापासूनच सणवार सुरू होतात पण सणांचा राजा म्हणता येईल ते दिवाळीला. त्यामुळेच दिवाळीला नवे कपडे खरेदी करायचे किंवा ऐन दिवाळीला घालायला मिळतील, अशा बेताने शिवायला तरी टाकायचे, हे ठरलेलंच असतं. त्याबरोबरच घरात साफसफाई करताना नको असलेल्या अनेक गोष्टी फेकून दिल्या जातात.

आधी संगणक डेस्कटॉप, मग मोबाइल, इंटरनेट, मग फेसबुक हे सारं हळूहळू भूतकालीन वाटू लागलंय. कॉरा, इन्स्टाग्राम यातून एखाद्याचं स्टेटस म्हणजे दर्जा नव्हे तर ती व्यक्ती आत्ता काय करतेय, हे समजू लागलंय. एकीकडं विज्ञान-तंत्रज्ञानात हे बदल वेगाने होत असतानाच समाजातली आर्थिक विषमताही त्याच वेगाने वाढताना दिसते. त्यामुळे या सगळ्या प्रगतीपासून काहीसे दूर असल्याने शिक्षणाच्या अभावामुळे दारिद्र्यामुळे मागे पडलेल्यांना या विज्ञान-तंत्रज्ञान प्रगतीचा थेट फायदा लगेच पोहोचत नाही. त्यामुळे काही कामांना प्रतिष्ठा मिळते तर काही कामं आजही तुलनेनं कमी प्रतीची समजली जातात.

पुण्यामधे स्वच्छ ही सहकारी पद्धतीनं चालवली जाणारी सफाई कामगारांची संस्था कार्यरत आहे. साडेतीन हजार कचरावेचक घरोघर जाऊन रोजच्या रोज कचरा गोळा करतात आणि महिन्याला आपल्या कुटुंबासाठी उत्पन्न मिळवतात. पुणे महापालिकेनंही या सहकारी तत्त्वावरच्या स्वच्छ उपक्रमाला पाठिंबा दिलेला आहे. पालिकेवर कोणताही आर्थिक बोजा न येता थेट घराघरातून दिल्या जाणाऱ्या कचराउचलण्याच्या मोबदल्यातून सर्व कचरावेचकांना दरमहा उत्पन्न मिळू लागलंय.

वर्षभर कचरा उचलण्याबरोबरच यंदा स्वच्छच्या वतीनं व्ही कलेक्ट हा उपक्रम फिरत्या वाहनांच्या माध्यमातून पहिल्यांदाच हाती घेण्यात आला. दिवाळीच्या आधी घर आवरताना थेट कचऱ्यात टाकता येत नाहीत पण जुन्या असल्यानं घरातही अडगळ होते, अशा अनेक वस्तू या उपक्रमातून गोळा करण्यात आल्या. जुने कपडे, भांडी, डबे, खेळणी, चपला, बूट, पुस्तकं, पिशव्या, पर्सेस, बँगा अशा नेहमीच्या वापरातल्या वस्तूंबरोबरच जुनी इस्त्री, टोस्टर्स, टीव्ही संच, मिक्सर, जुन्या मोबाईल्सचे चार्जर, संगणकसंच किंवा त्याच्या जुन्या वस्तू अशी ई-अडगळ यांचा त्यात समावेश होता.

खेळण्यांमधे विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या खेळण्यांसह दुचाकी, तीन चाकी लहान मुलांच्या सायकली, छोट्या मोटारसायकली, बाहुल्यांसह विविध खेळण्यांचा समावेश होता. पुण्यात ३८ ठिकाणी फिरत्या वाहनांमधून व्ही कलेक्ट या उपक्रमातून १ ते १३ नोव्हेंबर या पंधरवड्यात ही सारी अडगळ गोळा करण्यात आली. वारजे, कोथरूड, बावधनपासून ते स्वारगेट, हडपसर, कल्याणीनगर, विमाननगर, विश्रांतवाडी आणि अगदी निगडीसारख्या भागातूनही ही मौल्यवान अडगळ जमा झाली होती.

एकूण ४८ टन वजनाचं हे सामान स्वच्छ आणि पुणे महापालिकेनं व्यवस्थित मांडून गरजूंपर्यंत पोहोचवलं. त्या त्या वस्तूसाठी तुलनेनं कमी पैसे देऊन या वस्तू गरजूंना घेता आल्या. त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून कचरावेचकांच्या मुलांच्या शि७णासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या प्रमुख माधुरी सहस्रबुद्धे यांनीही या कामात मोलाचं योगदान दिलं आहे.

समाजात फारशी प्रतिष्ठा नसलेल्या कचरावेचकांनी सामूहिक प्रयत्नातून प्रतिषठितांची मौल्यवान अडगळ समाजातल्या गरजूंपर्यंत पोहोचवलीय. भाताचं एक शीतही वाया न घालवण्याची आपली संस्कृती, एत तिळ सात जणांनी वाटून खायचा, हे सांगणारी आपली संस्कृती. समाजात गरीब श्रीमंत राहणारच पण कचरावेचकांनी मौल्यवान अडगळीच्या रूपाने बांधलेला पूल भक्कम झाला तर हळू हळू ही दरी भरून निघायला मदत नक्कीच होईल.

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER