चित्रपटात यशस्वी झालेली पिता-पुत्रांची जोडी

successful father-son duo in the film.jpg

सुशांतच्या मृत्यूनंतर (Sushant’s death) बॉलिवुडमध्ये नेपोटिझम अर्थातच वंशवादाची जोरदार चर्चा सुरु झाली. बॉलिवूडमध्ये यशस्वी झालेल्यांच्या मुला-बाळांना कामे मिळतात, बाहेरच्यांना संधी मिळत नाही असे म्हटले जाऊ लागले. मात्र प्रख्यात लेखक गीतकार जावेद अख्तर यांनी बॉलिवुडमध्ये नेपोटिझम जरी असले तरी शेवटी तिकाटासाठी पैसे खर्च करून येणारा प्रेक्षकच कोणाला यशस्वी करायचे ते ठरवतो. त्यामुळेच अनेक यशस्वी कलाकारा, निर्माता, दिग्दर्शकांची मुले अयशस्वी झाल्याचे दिसते. अशा अयशस्वी झालेल्यांची संख्याच जास्त आहे असेही त्यांनी म्हटले होते. त्यांचे हे म्हणणे खरे आहे. बॉलिवूडमध्ये फार कमी असे कलाकार आहेत ज्यांनी यश मिळवले आहे. बॉलिवूडच्या अशाच प्रमुख यशस्वी पिता-पुत्रांच्या जोडींवर एक नजर

धर्मेंद्र-सनी देओल

कवीपासून ते इंजीनियर आणि चोरापासून ते इंस्पेक्टरपर्यंतच्या भूमिका धर्मेंद्र यांनी रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. बॉलिवुडमधील यशस्वी नायकांच्या यादीत धर्मेंद्रचे नाव फार वरचे आहे. अर्थात हे यश त्यांनी संघर्ष करूनच मिळवले. विविध प्रकारच्या भूमिका साकारीत त्यांनी प्रचंड यश आणि लोकप्रियता मिळवली. चित्रपट निर्मितीही सुरु केली आणि एवढेच नव्हे तर खासदार होऊन संसदेतही काम केले. पित्याच्या पावलावर पाऊल टाकून सनी देओलने बेताबमधून रुपेरी पडद्यावर आगमन केले. पित्याप्रमाणे सनीला संघर्ष करावा लागला नाही, त्याला सगळे तयार मिळाले. पण त्याच्यात अंगभूत गुण आणि पित्याप्रमाणे दणकट देहयष्टी असल्याने त्याला अॅक्शनपॅक्ड भूमिका मिळाल्या. या भूमिकांचे त्याने सोने केले आणि पित्याप्रमाणेच यश मिळवले. आणि आता तर सनी देओलही खासदार होऊन संसदेत पोहोचलेला आहे. पण धर्मेंद्रच्या दुसऱ्या मुलाला म्हणजे बॉबी देओलला मात्र पिता धर्मेंद्र आणि भाऊ सनीप्रमाणे यश मिळवता आले नाही हेही सत्य आहे.

सुनिल दत्त-संजय दत्त

सुनिल दत्त यांनीही संघर्ष करीत चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. केवळ अभिनयच नव्हे तर सुनिल दत्त यांनीही चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले होते. सुनिल दत्त यांनी साकारलेल्या अनेक भूमिका आजही अजरामर असून प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पत्नी नरगिसही नामवंत अभिनेत्री होती आणि त्यासुद्धा खासदार म्हणून संसदेत गेल्या होत्या. अशा या दांपत्याच्या घरात संजयचा जन्म झाला. संजय दत्तलाही अभिनय करायचा असल्याने पिता सुनिल दत्त यांनी संजय दत्तला लाँच करण्यासाठी ‘रॉकी’ चित्रपटाची निर्मिती केली. संजय दत्तनेही सुरुवातीला संघर्ष केला आणि नंतर पित्याप्रमाणेच यश मिळवले. नशेमुळे त्याच्या जीवनात काही काळ अंधार होता परंतु त्याने तो प्रयत्नपूर्वक दूर केला.

राकेश रोशन-ऋतिक रोशन

राकेश रोशन हे फिल्मी घराण्यातूनच आले होते. त्यांचे वडिल रोशनलाल नागरथ हे प्रख्यात संगीतकार होते. त्यामुळेच त्यांचा भाऊ राजेश रोशनही यशस्वी संगीतकार झाला. राकेश रोशन यांना मात्र अभिनयाची आवड होती. परंतु मुख्य नायकाऐवजी त्यांना सहनायकाच्याच भूमिका मिळत गेल्या. त्यामुळे त्यांनी अभिनय सोडून दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली आणि त्यात प्रचंड यश मिळवले. ऋतिक रोशनला लाँच करण्यासाठी राकेश रोशन यांनी ‘कहो ना प्यार है’ची निर्मिती केली. त्यानंतर ऋतिक रोशनने मेहनत करून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्याचा क्रिश हा सुपरहिरो आज प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अॅक्शन चित्रपट करण्यात ऋतिकचा हातखंडा मानला जातो. भारतीय पुरुषांमध्ये अत्यंत देखणा पुरुष म्हणूनही त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आहे.

जॅकी श्रॉफ-टायगर श्रॉफ

पेडर रोडवरील तीन बत्तीसारख्या मध्यमवर्गीय वस्तीत वाढलेल्या जॅकी श्रॉफने पाठिशी कोणीही नसताना, बॉलिवूडमध्ये कोणीही ओळखीचे नसताना मेहनत करून स्वबळावर चित्रपटसृष्टीत स्वतःची ‘हीरो’ म्हणून ओळख तयार केली. सुभाष घई यांनी प्रथम संधी दिलेल्या जॅकी श्रॉफने त्यानंतर शेकडो चित्रपट केले. आजही साठाव्या वर्षीही जॅकी श्रॉफ अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसत आहे. याच जॅकीच्या टायगर या मुलानेही बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जॅकीने आपल्या मुलाला लाँच केले नसले तरी टायगरने स्वबळावर चित्रपट मिळवले आणि यशही मिळवले. भारतीय सिल्व्हेस्टर स्टॅलोन असे टायगरला म्हटले जात आहे.

ऋषी कपूर-रणबीर कपूर

बॉलिवूडमध्ये कपूर खानदानाचे नाव फार वर आहे. अगदी पृथ्वीराज कपूर यांच्यापासून रणबीर कपूरपर्यंत कपूर खानदानातील अनेकांनी बॉलिवूडमध्ये यश आणि नाव मिळवले आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या ऋषी कपूर यांनी रोमँटिक बॉय म्हणून बॉलिवूडमध्ये पहिल्याच ‘बॉबी’ चित्रपटापासून ओळख निर्माण केली. त्यानंतर ऋषी कपूर यांनी शेकडो चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. नवीन नायिकांना लाँच करण्यासाठी नायक म्हणून ऋषी कपूर यांचीच निवड केली जात असे. पत्नी नीतूही बॉलिवूडमधील प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय नायिका. याच जोडप्याच्या घरी रणबीरचा जन्म झाला आज रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. पित्याप्रमाणे त्याला अजून यश मिळालेले नसले तरी त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या निर्मात्यांची संख्या कमी नाही आणि हेच त्याचे यश म्हणावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER