पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचा बोनस जाहीर – विजय वडेट्टीवार

vijay wadettiwar

नागपूर : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस देणार असल्याची घोषणा मदत, पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बुधवार (१८ नोव्हेंबर) रोजी नागपुरात केली होती. त्यानुसार आज मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वडेट्टीवार यांनी प्रस्ताव ठेवून मंजूर करवून घेतला. गुरुवारला (१९ नोव्हेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. धान खरेदीमध्ये सुरू असलेल्या १८०० रुपये हमीभावात थेट ७०० रुपयांचा अतिरिक्त बोनस जाहीर करीत आता थेट २५०० रुपये दराने धान खरेदी करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला असल्याची माहिती यांनी दिली .

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील काही भागांत धानाचे पीक घेतले जात असून या वर्षी चांगले पीक होणार असे दिसत असतानाच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे आलेली पूरपरिस्थिती तसेच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तथा वर्धा या पाचही जिल्ह्यांत धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर असून वर्षाकाठी हे एकमेव पीक या जिल्ह्यामध्ये घेण्यात येत असल्याने यावर शेतकऱ्यांची आर्थिक घडी अवलंबून आहे.

या जिल्ह्यामध्ये विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा या जिल्ह्यांत यंदा धान पिकावर अतिवृष्टी, पूरस्थिती आणि रोगराई या नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला. येथील विदारक परिस्थितीची पाहणी विजय वडेट्टीवार यांनी स्वतः शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन केली आणि स्वतःच्या विभागाकडून मदतसुद्धा जाहीर केली.

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे राज्य सरकारने पत्र पाठविले असता थेट केंद्रीय पथकही येऊन गेले; मात्र केंद्राकडून अद्याप ठोस अशी भरीव मदत मिळालेली नाही . एकंदरीत ही परिस्थिती बघता विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या धान पिकाला हमीभाव वाढवून देण्यासाठी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवला .

त्यानुसार आज महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ७०० रुपयांचा बोनस देण्याचा महत्त्व पूर्ण निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी असलेल्या १८०० रुपयांचे हमीभाव कायम असले तरी त्यात ७०० रुपये बोनसची भर पडल्याने आता शेतकऱ्यांकडील धान खरेदी ही २५०० रुपये दराने होणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आज मोठा दिलासादायक निर्णय ठरला असल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER