सुएझ कालव्यात अडकलेले ‘एव्हरगिव्हन’ जहाज मोकळे करण्यात यश !

Suez Canal

नवी दिल्ली :- इजिप्तच्या सुएझ कालव्यात (Suez Canal) गेल्या सहा दिवसांपासून अडकलेले ‘एव्हरगिव्हन’ जहाज आज अखेर मोकळे झाले, याची माहिती इन्च केप शिपिंग सर्व्हिसेसने दिली आहे. सुएज कालवा प्राधिकरणाने याआधी माहिती दिली होती की, विशालकाय कंटेनर जहाजाला अंशत: बाहेर काढले आहे. मात्र, जहाज पूर्णतः निघाल्याने संपूर्ण जगाला दिलासा मिळाला आहे.

आशिया व युरोपला जोडणारा आणि भू-राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असणारा इजिप्तचा सुएझ कालवा गेल्या काही दिवसांपासून ब्लॉक झाला होता.  समुद्री वाऱ्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या महाकाय जहाजची दिशा बदलली आणि ते सुएझ कालव्यात अडकले. त्यामुळे या समुद्री मार्गे होणारी वाहतूक थांबली. दरतासाला तब्बल २ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. महत्त्वाचे म्हणजे या ‘एव्हरगिव्हन’ जहाजावरील सर्व २५ क्रू भारतीय आहेत.

सुएझ कालवा म्हणजे समद्रातील १९३.३ किमीचा एक चिंचोळा मार्ग आहे. या कालव्यावर सत्ता गाजवण्यासाठी अनेक युद्धे झाली आहेत. सध्या सुएझ कालवा इजिप्तच्या ताब्यात आहे. जो  कालवा आशियाला युरोपशी जोडण्याचे काम करतो.

याच समुद्री मार्गाने ९० मोठी जहाजे आणि इतर अनेक लहान जहाजे प्रवास करतात. सुएझ कालव्यात हे महाकाय जहाज अडकल्याने जगाची तासाला सुमारे २ हजार ८०० कोटी रुपयांची अर्थव्यवस्था थांबली होती. जहाजाचा मालक जपानी व्यक्ती आहे. यामुळे चार दिवसांत ४०० जहाजांची वाहतूक बंद झाली. हा कालवा ब्लॉक झाल्याने रोज ९.७ बिलियन डॉलर्सच्या मालाची वाहतूक थांबली होती. त्यामध्ये ५.१ बिलियन डॉलर्सची वाहतूक ही पश्चिमी देशांची आहे, तर ४.६ बिलियन डॉलर्सची वाहतूक ही पूर्वेकडच्या देशांची आहे.