सुबोध जयस्वाल झाले सीबीआय चे नवे संचालक ; केंद्राची माहिती

Maharashtra Today

मुंबई :- महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त असलेले आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) हे सीबीआयचे नवे संचालक (CBI Director) झाले आहेत. केंद्र सरकारने त्यांच्या नावाची घोषणा केली.

सीबीआय संचालकपदाच्या निवडीसाठी उच्चस्तरीय पॅनेलची सोमवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीत सुबोध कुमार जयस्वाल यांचे नाव आघाडीवर होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. या पॅनलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि लोकसभेतील विरोधी पक्षातील नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे.

१९८५च्या आयपीएस बॅचचे सुबोध कुमार जयस्वाल हे सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक असून त्या अगोदर त्यांनी मुंबई पोलिस आयुक्त व महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक म्हणून काम पाहिले आहे.

महाराष्ट्रातल्या पोलिस कारकिर्दीत जयस्वाल यांनी देशातील कुप्रसिद्ध अशा तेलगी घोटाळ्याचा तपास सुरू केला होता. पण नंतर तो सीबीआयकडे वर्ग केला गेला. जयस्वाल त्यावेळी राज्य राखीव पोलिस दलाचे प्रमुख होते. नंतर ते महाराष्ट्र एटीएसमध्ये आले. त्यापुढे सुमारे एक दशक त्यांनी रॉ या गुप्तहेर संघटनेत काम केले.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार सत्तेत आल्यानंतर २०१८ मध्ये त्यांना मुंबईचे पोलिस आयुक्त व नंतर महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्त केले गेले होते. जयस्वाल यांच्याच नेतृत्वाखाली एल्गार परिषद व भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास सरकारने दिला होता. त्यानंतर त्यांची सीबीआयमध्ये बदली करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button