सुबोध येणार नवी गोष्ट सांगायला

गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही ! प्रत्येक जण त्याच्या लहानपणीच्या काळात पोहोचला तर त्याच्या आयुष्यात गोष्ट हा शब्द अगदी घट्ट आहे ते जाणवेल. गोष्ट ऐकणं जितकं सोपं आहे तितकं गोष्टी सांगणं सोपं नाही बर का ! म्हणूनच ज्यांना गोष्ट सांगणं जमतं ते नवी कुठली गोष्ट घेऊन येणार आणि ती कशा पद्धतीने आपल्या समोर मांडणार याची उत्सुकता नेहमीच असते. सिनेमाची कथा म्हणजे तरी दुसरं काय असतं ? एक छान गोष्टच तर असते. अशीच गोष्ट सांगण्यासाठी लवकरच अभिनेता सुबोध भावे हा सज्ज झाला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया पेजवर एक फोटो शेअर करत त्या सोबत दिलेली कॅप्शन वाचल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आता तो काय गोष्ट सांगणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्याने असे लिहिले आहे की, नवी गोष्ट घेऊन येतोय .. नव्या चौकटीत मांडायला . ती गोष्ट काय आहे आणि सुबोधची (Subodh Bhave) नवी चौकट काय आहे हे पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा तर करावी लागणारच.

बायोपिक म्हणजे सुबोध भावे हे समीकरण अभिनयाने अगदी घट्ट करणारा सुबोध भावे म्हणजे नेहमीच काहीतरी नवं घेऊन येणार हे पण आता समीकरण झाले आहे. मालिका असो नाटक असो, सिनेमा असो किंवा वेब सिरीज असो या चारही मनोरंजन माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने सहज सुंदर मुशाफिरी करणारा कलाकार म्हणजे सुबोध भावे. अभिनयासोबतच सुबोध भावेकडे उत्तम दिग्दर्शन कौशल्य आहे हे त्याने दिग्दर्शित केलेल्या कट्यार काळजात घुसली या सिनेमाने दाखवून दिलेच आहे. रंगभूमीवर गाजलेल्या नाटकाला सिनेमा टच देणारा दिग्दर्शक सुबोध भावे याने या सिनेमात दिग्दर्शन माध्यमातून कमाल केली होती. डॉक्टर काशिनाथ घाणेकर आणि लोकमान्य टिळक या दोन व्यक्तिरेखा साकारतही सुबोध भावेने त्याच्या अभिनयाची चुणूक आणि खोली दाखवून दिली. कट्यार काळजात घुसली या सिनेमानंतर सुबोधच्या दिग्दर्शनाकडेही अनेकांचे लक्ष लागले होते. आता त्यानेच पोस्ट केलेल्या फोटो आणि कॅप्शनमुळे सुबोधची नवी गोष्ट काय असेल यासाठी त्याची पुढची पोस्ट पाहणे रंजक ठरेल.

काही दिवसापूर्वी सुबोधने घोडेस्वारी करत असलेला एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला होता. आणि त्या सोबतही “तयारी” अशा एका शब्दात त्याच्याखाली ओळ लिहिली होती. याचा अर्थ सुबोध दिग्दर्शन करणार असलेल्या सिनेमात स्वतः भूमिकाही करणार असल्याचे संकेत त्या व्हिडिओ मधून दिसत आहेत. शिवाय या व्हिडिओमध्ये तो घोडेस्वारी शिकत असल्याने त्याचा पुढचा सिनेमा हा ऐतिहासिक गोष्ट असेल का अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे. पण काही असलं तरी सुबोधने ही उत्सुकता चांगलीच ताणून धरली आहे. नवी गोष्ट नवी चौकट असं म्हणत सुबोध नक्कीच काही तरी हटके घेऊन त्याच्या चाहत्यांसमोर येणार आहेत हे आता त्याच्या चाहत्यांनी पुरते ओळखले आहे. सध्या सुबोध चंद्र आहे साक्षीला या मालिकेत श्रीधर ही भूमिका करत आहे. या भूमिकेतला थोडीशी ग्रे शेड आहे.

यापूर्वी सुबोधने तुला पाहते रे या मालिकेमध्ये अशीच ग्रे शेड असलेली भूमिका केली होती. सिनेमा आणि नाटकांमध्ये नायक साकारत असलेल्या सुबोध मालिकेत मात्र गेल्या काही दिवसात ग्रे शेडच्या भूमिका करत चाहत्यांना आपलंसं करत आहे. अभिनय आणि दिग्दर्शनसोबत सुबोध निर्मिती क्षेत्रातही यशस्वीपणे उतरला असून सुबोधची निर्मिती असलेली शुभमंगल ऑनलाईन ही मालिकादेखील सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. एकूणच काय तर मनोरंजन विश्वातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हात लावेल तिथे सोनं करण्याचं कसब सुबोधने त्याच्यातील कौशल्याने कमावलेलं आहे. अभिनयाच्या आवडीतून सुबोधने या क्षेत्रात आपले स्थान भक्कम केले आहे. मूळचा पुण्याचा असलेला सुबोध खरे तर कॉलेज जीवनामध्ये अभिनय क्षेत्रात येईल की नाही अशी शक्यता होती. कारण त्याला त्यावेळी अभिनय आवडतही नव्हता पण त्याच्या आयुष्यात एक अशी संधी आली ज्यामुळे त्याला अभिनय करावा लागला आणि त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. अभिनेता जितेंद्र जोशी आणि सुबोध भावे त्यांच्या कॉलेज जीवनात ही जोडी एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी यामध्ये काम करत होती. आजही या दोघांची मैत्री कायम आहे. सुबोधने आजवर केलेले सिनेमेदेखील वेगळ्या विषयावर बेतलेले होते. त्यामुळे त्याची सिनेमा असो किंवा मालिका असो किंवा नाटक या विषयाची निवड ही वेगळी ठरली आहे. एखादा विषय हातात घेतला की त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याची मांडणी करणं हे सुबोधच्या कामाचं कौशल्य आहे. म्हणूनच जेव्हा लोकमान्य टिळक या सिनेमासाठी तो काम करत होता तेव्हा त्याने लोकमान्यांची अनेक पुस्तके वाचून काढली. तीच गोष्ट कट्यार काळजात घुसली या सिनेमाचे दिग्दर्शन करण्यापूर्वीही त्याने या नाटकाचा संपूर्ण अभ्यास केला. नाटक हे सिनेमा म्हणून माध्यमांतर करत असताना त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याविषयी त्याने खूप विचार केला आणि त्यानंतरच त्याने हे नाटक सिनेमा म्हणून दिग्दर्शित केलं. वाचनाची प्रचंड आवड असलेला सुबोध त्याच्या शुटींगमधून वेळ मिळाला की वेगळे काय वाचायचं याचा विचार करत असतो. लवकरच तो एक नवी गोष्ट घेऊन येत असल्याचे त्याने जाहीर केले असले तरी सध्या त्याचा या नव्या गोष्टींची मांडणी करण्याबाबतचा अभ्यास सुरू आहे. आता कुठे त्याने, नवी गोष्ट सांगायला येतोय असं म्हणत एक पाऊल टाकले आहे . आता त्याची अख्खी गोष्ट ऐकायला कधी मिळते याची उत्सुकता नक्कीच प्रत्येकाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER