आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर : २०२०-२१ वर्षात जीडीपी ११ टक्के वाढण्याचा अंदाज

Nirmala Sitharaman & GDP

दिल्ली :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी २०२०-२१ वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर केला. या वर्षात जीडीपी (देशाच्या सकल घरगुती उत्पादनात )  ११ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

मात्र, कोरोना (Corona) साथीच्या काळात २०२०-२१ वर्षात सकल घरगुती उत्पादन (जीडीपी) उणे ७.७ टक्के होणार आहे. जीडीपीमध्ये ७.७ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत आगामी वर्षात चांगली सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२१-२२ वर्षात जीडीपीत ११ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

कोरोनाच्या संकटाचा काळ लक्षात घेता सरकारने खर्च वाढवण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात प्राचीन राजा-महाराजांच्या काळातील उदाहरण देण्यात आले आहे. दुष्काळ, पूर आणि नैसर्गिक संकटाच्या काळात रोजगारनिर्मितीसाठी त्या काळातील हिंदुस्थानी राजे-महाराजे किल्ले, महाल उभारत होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सध्याच्या संकटाच्या काळात अर्थचक्राला गती देण्यासाठी सरकारने खर्च वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोनाच्या साथीमुळे या वर्षात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. इतर रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार जीडीपीमध्ये १० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये २४ टक्के घट झाली आहे. दोन तिमाहीतही जीडीपीत घसरण झाली आहे. तिसऱ्या तिमाहीतही घसरणीचा अंदाज आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात केलेल्या सूचना सरकारला बंधनकारक नसतात. आर्थिक सर्वेक्षण अहवाल मुख्य आर्थिक सल्लागारांची (CEA) टीम तयार करते. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER