वंदेमातरम्‌ हेल्थ पोस्ट’साठी प्रस्ताव सादर करा : दयाशंकर तिवारी

नागपूर : नागपूर शहरात साकारण्यात येणाऱ्या ‘वंदेमातरम्‌ हेल्थ पोस्ट’च्या (Vandemataram Health Post) जागांचे अंतिम प्रस्ताव आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari) यांनी दिले.

मनपाच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रस्तावित योजना आणि ‘वंदेमातरम्‌ हेल्थ पोस्ट’ या प्रकल्पासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ज्या भागात आरोग्यसेवेची गरज आहे, अशा भागात हेल्थ पोस्ट उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी झोननिहाय जागा निवडण्यात आल्या आहेत. त्या अंतिम करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करावी आणि पुढील आठ दिवसांत अंतिम प्रस्ताव पाठवावे, असे निर्देश तिवारी यांनी दिले. ६८ जागांची निवड ‘वंदेमातरम हेल्थ पोस्ट’साठी करण्यात आली आहे. यासगळया हेल्थ पोस्टमध्ये आवश्यक सर्व व्यवस्था करण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले आहेत.

यासोबतच महापौरांनी आयुष हॉस्पिटल, जननी सुरक्षा योजना, रोगनिदान केंद्र, सिकलसेल रुग्णांसाठी डे केअर सेंटर, चालता-फिरता दवाखाना, गांधीनगर येथील रक्तपेढी, मदर मिल्क बँक आदी सर्व योजना आणि प्रकल्पांचा आढावा घेतला. मंत्रालयाच्या माध्यमातून मंजूर होणाऱ्या आयुष रुग्णालयासाठी जागा निवडीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांनी सिकलसेल रुग्णांची संपूर्ण रक्त तपासणीची व्यवस्था नागपुरात करण्याची सूचना दिली.

मनपाच्यावतीने गांधीनगर येथील रुग्णालयात रक्तपेढी संचालित करण्यात येते. ही रक्तपेढी लोकसेवेच्या भावनेतूनच संचालित करण्यात येत आहे. ही माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी, यासाठी त्याची योग्य पद्धतीने प्रसिद्धी करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच रक्तदानाचे विविध उपक्रम राबविण्याची सूचनाही तिवारी यांनी दिली. मनपाची आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी कुठलीही हयगय न करता दिलेल्या निर्देशांचे पालन करून तातडीने सर्व प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावा, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER