इराणशी कृषी उत्पादनाचा व्यापार वाढविण्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

इराण-भारत उद्योग चर्चासत्र

Subhash Desai

मुंबई: महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक क्षेत्रात सातत्याने आघाडीवर असलेले राज्य आहे. कृषी उत्पादनाच्या बाबतीतही राज्य समृद्ध आहे. इराणसोबत असलेल्या तेल व्यापारासह कृषी उत्पादनाच्या व्यापारातही वाढ व्हावी अशी अपेक्षा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. ऑल इंडिया असोशिएशन ऑफ इंडस्ट्रीजद्वारे आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते.

इराणचे परराष्ट्रमंत्री डॉ. मोहम्मद जावेद झरीफ यांच्यासोबत राज्यातील उद्योजकांचा संवाद असे या चर्चासत्राचे स्वरुप होते. यावेळी इराणचे उपमंत्री सय्यद अब्बास मुसारी,इराणचे राजदूत अली चिंगानी, इराणचे भारतातील वाणिज्यदूत अली खिलानी आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, देशाच्या एकूण सकल उत्पन्नाच्या 15 टक्के वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा आहे. तर देशातून होणाऱ्या निर्यातीत एक तृतीयांश निर्यात ही राज्यातून होत असते. थेट परकीय गुंतवणुकीतही राज्यात सर्वाधिक गुंतवणूक होत आहे. यासोबतच उद्योग उभारणीसाठी आवश्यक असणारे घटक जमीन, पाणी, वीज आणि कुशल मनुष्यबळ इथे मुबलक प्रमाणात आहे. राज्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इराणसोबत भारताचे मित्रत्वाचे संबध आहेत. हे संबध अधिक दृढ होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नॅनो तंत्रज्ञान भारतासाठी वापरावे- डॉ.झरीफ

तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने जागतिक चित्र बदलले आहे. नॅनो टेक्नॉलॉजी या क्षेत्रात इराण आज देशात आघाडीवर आहे. या तंत्रज्ञानाचा वापर भारताने करावा असे डॉ. मोहम्मद जावेद झरीफ यांनी यावेळी सांगितले. अभियांत्रिकी प्रशिक्षणात इराण जगात चौथ्या क्रमांकावर आहे. रुपया आणि रुबेल या इराणी चलनामध्ये औद्योगिक व्यवहार व्ह्यायला पाहिजेत यासाठी भारतात इराण बॅंक सुरु करण्यासंदर्भातही चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यातील उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांना इराणचे परराष्ट्र मंत्री डॉ. मोहम्मद जावेद झरीफ यांनी उत्तरे दिली.