असा चष्मा सुरेख बाई !

Prasad Oak

गंमत म्हणून केलेली एखादी स्टाईल किंवा एखादी फॅशन आपल्याला एखादा पुरस्कार मिळवून देईल असा विचार तुम्ही कधी केला होता का? अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) यानेदेखील केला नव्हता; पण त्याने त्याच्या अतरंगी स्वभावाप्रमाणे एक असा चष्मा घेतला आणि तो चष्मा लावून असा फोटो काढला की त्याचा हा अफलातून चष्मा त्याला अस्सल स्टाईल आयकॉन २०२० (Style Icon 2020) हा पुरस्कार मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरला. चष्म्याच्या दोन्ही फ्रेम एकाच आकाराच्या असतात. पण प्रसादने त्याचा अतरंगीपणा वापरला आणि एका फ्रेमचा आकार चौकोनी तर दुसऱ्या फ्रेंमचा आकार गोल असा हटके चष्मा घालून केलेले फोटोसेशन हे प्रसादला स्टाईल स्टेटमेंट २०२० हा पुरस्कार मिळवून देणारे ठरले आहे.

अर्थात प्रसादने त्याच्या या पुरस्काराचे श्रेय त्याच्यामधल्या काहीतरी वेगळं शोधण्याच्या अतरंगी स्वभावाला दिले आहे. शेमारू मराठी बाणा या पोर्टलतर्फे अस्सल स्टाईलबाज २०२० हा स्टाईल आयकॉन पुरस्कार जाहीर केला होता. अर्थात या पुरस्कारासाठी वेगवेगळे सेलिब्रिटी काही स्टाईल करून आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यातूनच एका स्टाईलबाज कलाकाराला हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये प्रसादने दोन वेगवेगळे आकार असलेल्या फ्रेमचा चष्मा घातलेली स्टाईल मारत पुरस्कारावर नाव कोरलं. आपण नेहमीच पाहतो की ,सेलिब्रिटी त्यांचे वेगवेगळ्या स्टाईलमधले, फॅशनेबल ड्रेसमधले फोटो त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करत असतात. तसेच सणासुदीच्या निमित्तानेही हटके स्टाईल आयकॉन कलाकार चाहत्यांना त्यांची अदा दाखवत असतात. त्यांचे चाहतेदेखील आपल्या आवडत्या कलाकाराच्या वेगवेगळ्या स्टाईलमधले फोटो पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

मात्र या सगळ्या कलाकारांच्या मांदियाळीत प्रसाद कुठे तरी नेहमीच मागे असतो. पण यावेळी सगळ्यांच्या पुढे जात प्रसादच्या एक अतरंगी करामतीने त्याला स्टाईल आयकॉन बनवले आहे. याचं त्याला खूप आश्चर्यही वाटतं आणि एकीकडे आनंदही होत आहे. एका मुलाखतीमध्ये प्रसादला विचारलं होतं की, तुला कुठल्या प्रकारची स्टाईल करायला आवडते? तेव्हा प्रसादने दिलेलं उत्तरदेखील खूप वेगळं होतं. तो म्हणतो की, मला शरीर झाकायला कपडे घालतात एवढंच माहीत आहे. जर जगात महिला नसत्या तर मी कपडेदेखील घातले नसते, असं तो गमतीने म्हणाला होता. सांगायचं तात्पर्य हेच की, फार स्टाईलबाज ड्रेसेस घालणे, वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालणे यामध्ये प्रसादला कधीच रस नाही. कुठे कार्यक्रमाला किंवा पुरस्कार वितरण समारंभाला जायचे असेल तर प्रसादची बायको मंजिरी हीच त्याच्या ड्रेसची निवड करत असते. त्यामुळे ड्रेसची निवड या बाबतीत तसा प्रसाद हा ढ मुलगाच आहे हे तो स्वतः मान्य करतो.

मात्र एक हजरजबाबीपणा, कोपरखळ्या, शब्दांची गंमत करण्याची लकब प्रसादकडे आहे आणि यामुळेच तो त्याच्या सोशल मीडिया पेजवर चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर तो कशा पद्धतीने भाष्य करतो, कशा पद्धतीने एखाद्या परिस्थितीवर चिमटे काढून व्यक्त होतो आहे ही त्याची खासियत त्याच्या चाहत्यांना नेहमी आवडते. खरं तर हीच त्याची स्टाईल आहे. पण शेमारू मराठी बाणा या पोर्टलने स्पर्धा जाहीर केली आणि या स्पर्धेमध्ये अचानक प्रसाद हा त्याच्या चष्म्यामुळे निवडला गेला हे सगळं जुळून आलेल्या भट्टीप्रमाणे घडले आहे, असं प्रसादलादेखील वाटतं. नाटक, सिनेमा, मालिका या तीनही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळे स्थान निर्माण करणारा प्रसाद सध्या निर्मिती, दिग्दर्शन यामध्येदेखील घोडदौड कायम ठेवत आहे.

‘कच्चा लिंबू’ या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद ओकनं केलं होतं तर ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकातील त्याचा अभिनय त्याच्या चाहत्यांना खूप आवडला होता. ‘अवघाचि संसार’ या मालिकेतील त्याने वठवलेला विकृत नवरा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे ही त्याच्या अभिनयाची पावती आहे. अभिनयासोबत प्रसाद खूप चांगला गायक आहे. सारेगमपच्या पहिल्या सेलिब्रिटी पर्वाचा तो विजेता ठरलेला आहे. ज्या गोष्टीशी प्रसादचा फारसा संबंध नाही त्या स्टाईल प्रांतांमध्ये प्रसादची या पुरस्काराच्या निमित्ताने एन्ट्री झालेली आहे. त्यामुळे यापुढे प्रसाद कोणकोणत्या वेगळ्या स्टाईल ट्राय करतो याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER