मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांच्या कर्जासाठी अभ्यासगट : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

मुंबई : ग्रामीण भागात वित्त पुरवठा करणाऱ्या मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांच्या कर्ज चक्रव्युहामध्ये अडकलेल्या महिलांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली. हा अभ्यासगट पुढील तीन महिन्यात अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहे.

अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा (Nima Arora) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी एस., धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वनमती सी, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखर या सदस्यपदी आहेत. तर लक्ष्य प्रतिष्ठान (अमरावती)च्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्ष (राजगुरुनगर, जि. पुणे) विजया शिंदे, लोकप्रतिष्ठान (उस्मानाबाद)च्या सचिव डॉ. स्मिता शहापुरकर, स्वयंसिद्धाच्या (कोल्हापूर) संचालिका कांचन परुळेकर या अशासकीय सदस्य आहेत. तर उमेद अभियानाच्या अतिरिक्त संचालक मानसी बोरकर ह्या या समितीच्या सदस्य सचिव आहेत.

राज्यस्तरीय अभ्यासगट अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार उपगट निर्माण करुन ते उपगट विविध जिल्ह्यांना भेटी देतील. राज्यातील महिलांशी चर्चा करुन त्यांच्या आर्थिक समस्या जाणून घेतील. महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे अध्यक्ष व महासंचालक यांच्यासोबत चर्चा करुन त्याच्याकडील स्वयंसहाय्यता गटाची कार्यपध्दती त्यांचे उत्पादने आणि त्यांचे विपणन याबाबत महिती घेतील. सदर अभ्यासगट हा फक्त महिलांच्या आर्थिक अडचणी, त्यावर उपाययोजना यासाठी असून मायक्रोफायनान्सच्या कर्जमाफीसाठी नाही, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER