वर्ध्यात स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ स्थापण्यासाठी अभ्यास समिती

mhnews2 1

मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीस स्वच्छ भारत ही आदरांजली ठरावी यादृष्टीने वर्ध्यातील सेवाग्राम या ठिकाणी स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त निपुण विनायक, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील स्वच्छता विभागाचे उपसचिव, आयआयटीचे प्राध्यापक विरेंद्र शेट्टी, सेवानिवृत्त प्राचार्य अनिल राव, डॉ. अश्विनी कुमार शर्मा, प्राध्यापक अमोल देशमुख हे सदस्य आहेत तर विद्यापीठ शिक्षणचे उपसचिव हे या समितीमध्ये समन्वय अधिकारी असणार आहेत.

या समितीमध्ये आवश्यकतेनुसार निमंत्रित सदस्य म्हणून अन्य सदस्यांचा समावेश करता येणार आहे. ही समिती स्वच्छ भारत विद्यापीठासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालये याबरोबरच या विश्वविद्यापीठाचा अभ्यासक्रम, मनुष्यबळ यांचा अभ्यास करुन दोन महिन्यांमध्ये आपला अहवाल शासनास सादर करणार आहे.