‘ब्लू व्हेल’गेम च्या नादात पुन्हा एका विद्यार्थ्याची आत्महत्या!

मिदनापूर: ‘ब्लू व्हेल गेम ’ च्या वेडापायी एका १० विच्या विद्यार्थाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगाल मधील मिदनापूर इथल्या अंकन डे या मुलाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्याने ‘ब्लू व्हेल’ गेमच्या सूचनांनुसार घराच्या बाथरुममध्ये डोकं प्लास्टिकच्या पिशवीत बांधून स्वत:च्या गळ्याभोवती नायलॉन दोरी आवळून आत्महत्या केली आहे . “अंकन शनिवारी शाळेतून परत आला आणि संगणकासमोर बसला. त्याची आई दुपारच्या जेवणासाठी बोलावत होती, तेव्हा त्याने अंघोळ करुन येत असल्याचं सांगितलं. बराच वेळ झाला तरी अंकन बाहेर आला नाही. त्यानंतर बाथरुमचा दरवाजा तोडला, त्यावेळी अंकन बाथरुममध्ये डोक्याला प्लॉस्टिक पिशवी बांधून पडलेला दिसला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ” असं अंकनचे वडील गोपीनाथ डे यांनी सांगितलं.

अंकनच्या मित्रांनी तो ब्लू व्हेल गेम खेळत असल्याचं सांगितलं. काही दिवसांपासून तो अस्वस्थ असायचा, शाळेतही त्याची वागणूक काहीशी बदलली होती, तो एकटाच असायचा त्याच्या या वर्तनाबद्दल त्याच्या आईलाही कळविण्यात आलं असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांकडून देण्यात आली. त्याने या गेमबद्दल त्याच्या मित्रांनाही सांगितलं असल्याचं समोर आलंय. रशियात उत्पन्न झालेला हा जीवघेणा ऑनलाइन गेम, स्वत:ला इजा पोहोचविण्याचे टास्क देत असतो. त्यामध्ये प्लेअरला ५० जीवघेण्या स्टेप्स पूर्ण कराव्या लागतात. जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ब्ल्यू व्हेल गेमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.