दुंभगलेले विरोधक आणि एकसंघ भाजप

all-party

कोल्हापूर :- कोल्हापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चार नेत्यांची चार दिशेला तोंडे आहेत. दोन्ही कॉग्रेसचा बुरुज ढासळत चालला आहे. शिवसेना कागदावर बलाढ्य असली तरी आमदार आणि संघटना यांच्यात दुरावा आहे. मात्र, भाजप हाच एकमेव असा पक्ष आहे जिथे पक्ष व संघटना एकाच दिशेने जात आहे. पक्षादेश हीच पूर्व दिशा असल्याने भाजप एकदिलाने राबताना दिसत आहे. अशा वातावरणामुळे येत्या विधानसभा निवडणुकांत दुंभगलेले विरोधक आणि एकसंघ भाजप अशी लढत होणार आहे. दोन्ही काँग्रेस ‘अभी नव्हे तो कभी नही’ अशा जोशात मैदानात उतरत आहेत. तर भाजपपुढे आतापर्यंतचे यश हे सूज नव्हे तर ताकद असल्याचे दाखवून देण्याचे आव्हान असणार आहे.

भाजपने आतापर्यंत गेल्यापाच वर्षात केलेल्या जोडण्या आतापर्यंतच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती व सरपंच निवडणुकीत फळाला आल्या. काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री विनय कोरे हे दोन पारंपारिक राजकीय विरोधकांना भाजपने आपल्या व्यासपीठावर आणले. भाजपने मिळविलेले घवघवीत यश हे अपघाताने किंवा दोन्ही काँग्रेसच्या इनकमिंग कार्यकर्त्यांवर मिळविलेले नाही, तर ते शतप्रतिशत भाजपचेच यश आहे. हे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून देण्यासाठीच भाजपची थिंक टँक राबताना दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : नागपूर बोले तो; भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

दुसऱ्या बाजूला काँग्रेस व राष्ट्रवादीला आउटगोईंगने पोखरले आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सवता सुभा मांडत चार ठिकाणी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निश्चय केला आहे. आमदार सतेज पाटील, पी.एन. पाटील, जयवंतराव आवळे आदींच्या गटा-तटाच्या राजकारणातून काँग्रेस बाहेर पडलेली नाही. धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिल्याने आ.हसन मुश्रीफ यांच्यावर पक्षाची मदार आहे.

कोल्हापूर हा दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला आता फक्त कागदावर राहिला आहे. विधानसभेत काँग्रेसची जिल्ह्यात पाटी कोरी आहे. गेल्या पाच वर्षात एका मागून एक सत्ताकेंद्रावर भाजपचे कमळ फुलत असताना दोन्ही काँग्रेसचे नेते मात्र जिल्ह्याचा नेता कोण? यास्पर्धेत रंगले होते.

हीच अवस्था राष्ट्रवादीची आहे. खा. धनंजय महाडिक व आ. हसन मुश्रीफ हे दोन जिल्ह्याचे नेते होते. आता मुश्रीफ यांच्यावरच राष्ट्रवादीची मदार आहे. शरद पवारांच्या साक्षीने के. पी. व ए. वाय. शितयुध्द संपले असले तरी आमदारकीचा दावा दोघांकडून होत आहे. शहरात माजी नगरसेवक राजू लाटकर व आदिल फरास या युवानेत्यांत उघड धुसफुस आहे. वरुन खालीपर्यंत राष्ट्रवादीत स्पर्धा सुरु आहे. दोन्ही पक्षात अतंर्गत कुरघोड्या कमी आहेत म्हणून की काय? राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवाजिरवाची भाषा संपलेली नाही.

शिवसेनेचे जिल्ह्यात सहा आमदार असले तरी राजकीय ताकद दिसलीच नाही. सेनेचे वाघ म्हणवणारे लढ्यात जिंकले मात्र तहात हारलेत. जिल्हापरिषदेत हुकमी संख्याबळ असूनही सेना दुंभगली. आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांचे वेगवेगळे गट सक्रीय आहेत. आमदार गट व जिल्हाप्रमुख गटात सेनेची विभागणी आहे. विधानसभा महत्वाची मानत आपल्या मतदारसंघात पक्षीय परिघाबाहेर सेनेच्या आमदारांनी जोडण्या घातल्या आहेत. याउलट शेठजी-भटजींचा शहरी तोंडावळा असलेला पक्ष ही हेटाळणी पुसत भाजपने जिल्ह्यातील प्रत्येक सत्ताकेंद्रात कमळ फुलविले आहे. जिल्हापरिषदेत एक वरुन थेट १४ जागावर धडक दिली. भाजप महाआघाडीने २५ जागांवर बाजी मारत आता थेट सत्तास्थापन केली. भाजपने शिवसेना या मित्र पक्षाला जागा दाखवून देण्याबरोबरच राष्ट्रवादीला मागे सारत काँग्रेसच्या बालेकिल्यात विजयी पताका रोवली. पार्श्वभूमीवर बीजेपीचे कडवे आव्हान विधानसभा निवडणुकीत असेल.