एसटीचा मालवाहतुकीच्या क्षेत्रात प्रवेश.. – अ‍ॅड. अनिल परब यांची माहिती

Anil Parab

मुंबई : प्रवासी वाहतूकी बरोबरच एसटी महामंडळ आता वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची वाहतूकही करणार आहे…कारण महाराष्ट्र शासनाने दिनांक 18 मे 2020 रोजी प्रसारित केलेल्या अधिसूचनेद्वारे कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन(एसटी) महामंडळास प्रवासी वाहनांमधून मालवाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.

कोकणच्या हापूस आंब्या पासून मालवाहतूकीस प्रारंभ..
एसटीने मालवाहतूकीचा प्रारंभ कोकणच्या हापूस आंब्याच्या वाहतूकीने केला असून १५० आंब्यांच्या पेट्या घेऊन एसटीचा एक ट्रक रत्नागिरी कडून बोरिवलीकडे निघाला आहे. लवकरच कोकणचा हापूस मुंबई-पुण्याच्या चोखंदळ ग्राहकांना सहज उपलब्ध होणार आहे.

एसटीच्या विस्ताराचा मालवाहतूकीला भक्कम आधार..
गेली ७२ वर्ष अविरत प्रवासी दळणवळण सेवा देणारे एसटी महामंडळ देशातील एक अग्रगण्य सार्वजनिक दळणवळण उपक्रम असून त्यांच्या सेवेचे जाळे 250 आगार व 601 बसस्थानकामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे. महामंडळाकडे सुमारे 18 हजार 500 बसेस असून त्यामध्ये सुमारे 300 ट्रक चा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी, महामंडळाने प्रवासी वाहतूकीसाठी असलेल्या सुविधांचा लाभ मालवाहतूक करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीचे मालवाहतुक वाहन तयार होणार…
सुरुवातीला महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या ट्रक मधून मालवाहतूक करण्यात येणार असून त्यामधून नऊ मेट्रिक टन पर्यंत वजनाच्यामालाची वाहतूक थेट पद्धतीने किंवा टप्पा पद्धतीने केली जाणार आहे. महामंडळातर्फे विहित आयुर्मान पूर्ण केलेल्या प्रवासी वाहनांमध्ये अंतर्गत बदल करून 9 मेट्रिक टन वजनाचा पर्यंतच्या मालाची वाहतूक केली जाणार आहे.

मालवाहतुकीच्या ” बुकिंगची ” व्यवस्था…
मालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या बुकिंगची व्यवस्था, महामंडळाच्या प्रत्येक आगारात व बस स्थानकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे व यासाठीची कार्यप्रणाली लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

माफक दरात मालवाहतूक….
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या तसेच इतर मालाच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे व त्यामुळेच राज्य परिवहन महामंडळाने अतिशय माफक दरामध्ये मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालवाहतूकीसाठी मध्यवर्ती कार्यालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती…
मालवाहतुकीची कार्यप्रणाली ठरविण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या महामंडळाच्या विभागीय कार्यालयात समन्वय अधिकाऱ्याची (नोडल ऑफिसर) ची नेमणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे समाजातील सर्व घटकांना म्हणजेच शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना माफक दरात उपलब्ध करून दिलेल्या मालवाहतुकीच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा असे आवाहन माननीय परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल परब यांचेकडून करण्यात आलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला