नागपुरसह देशभरात नागरिकत्व कायद्याविरोधात तीव्र आंदोलन

नागपूर :-  नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात हिंसाचार उफाळून आला आहे. चांदा ते बांदा आणि गल्ली ते दिल्ली हे आंदोलन पेटले आहे. तर, डावे आणि मुस्लिम संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे.

डावे पक्ष, आंबेडकरवादी संघटना आणि विविध पुरोगामी संघटनांनी आज मुंबईसह नागपूर, मालेगाव, अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादमध्ये आंदोलनं करून या विधेयकाचा निषेध नोंदवला. तानाशाही नही चलेगी’च्या घोषणा देत आणि अखंड भारताचा नारा देत मोर्च्यात सहभागी झालेल्या हजारो तरुण-तरुणींनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

ही बातमी पण वाचा : प्रियंका चोप्राचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरातील लोकांच्या साथीला आता महाराष्ट्रातील लोकही एकवटले आहेत. औरंगाबादमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तर, नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने या कायद्याविरोधातील मुस्लीम समाजाचा भव्य मोर्चा आज नागपूरमधील विधानभवनावर धडकला.

मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमल्याने ग्रँट रोड परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दरम्यान, नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनामुळे अफवा पसरू नये म्हणून दक्षिण मुंबईतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ग्रँट रोड येथील आझाद क्रांती मैदानात आज विविध पुरोगामी संघटनांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं. दुपारी ४ वाजता हा मोर्चा सुरू झाला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा समानतेच्या विरोधात असून असंविधानिक आहे, असं सांगत हा कायदा तात्काळ मागे घ्या, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी यावेळी केली. या आंदोलनात सिने अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री हुमा कुरेशी, अभिनेता सुशांत सिंह यांनीही भाग घेतला. विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात भाग घेतला होता. छात्रभारती, स्मयक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनांबरोबरच सीपीआय, रिपाइंचे विविध गट, भीम आर्मी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही या मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.

उत्तर प्रदेश, बिहारपासून ते बंगळुरूपर्यंत हे आंदोलन तीव्र झालेले पाहायला मिळत आहे. डाव्यांच्या या बंदला विरोधकांनी समर्थन दिलं आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. तर दिल्लीतील 14 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.