भक्कम पुरावे आणि ऐतिहासिक नोंदीवर दिला रामजन्मभूमीचा निकाल : रंजन गोगोई

Ram Mandir - Ranjan Gogoi

दिल्ली : रामजन्मभूमी खटल्याचा निकाल भक्कम पुरावे आणि ऐतिहासिक नोंदीवर दिला, या शब्दांत  माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई या खटल्याच्या निकालाचे समर्थन केले. ‘अयोध्या से अदालत तक भगवान श्रीराम’ या माला दीक्षित यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रकाशन ऑनलाईन करण्यात आहे. रंजन गोगोई म्हणाले, “४० दिवस ज्येष्ठ आणि वरिष्ठ वकिलांच्या पीठाने या खटल्यात मोठे सहकार्य केले. हा खटला अभूतपूर्व असा होता. सर्वंकष मुद्यांवर भक्कम पुरावे आणि ऐतिहासिक नोंदीवर हा निकाल देण्यात आला. अंतिम निकाल देण्याचे काम अनेक कारणांमुळे आव्हानात्मक होते. प्रत्येक मुद्यावर टोकाचा युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी पूर्ण ताकदीने आणि इच्छाशक्तीने मुद्दे मांडले.

देशाच्या न्यायालयीन इतिहासात पूर्ण ताकदीने लढल्या गेलेल्या खटल्यापैकी हा एक महत्त्वाचा खटला होता. या खटल्याचे नेहमीच एक वेगळे महत्त्व राहणार आहे. मौखिक व वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेला दस्तऐवज व साक्षीदारांच्या आधारावर या बहुआयामी खटल्यावर अंतिम निकाल देण्यात आला.” असे गोगोई म्हणाले.

९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल दिला होता. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER