निकालातील शिवराळ शब्दांवरून सत्र न्यायाधीशाबद्दल तीव्र नापसंती

Aurangabad High Court

औरंगाबाद :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील एका अतिरिक्त सत्र न्यायाधीशाने निकालपत्रात बोलीभाषेतील शिवराळ शब्द वारंवार वापरल्याचे निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench High Court) त्याबद्दल तीव्र  नापसंती नोंदविली आहे.

राहुरी तालुक्यातील वारशिंडे येथील महादू दगडू शिंदे या आरोपीस बलात्कार खटल्यात निर्दोष मुक्त करताना कोपरगाव येथील त्या वेळचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. रणपिसे यांनी १४ ऑगस्ट, २०१२ रोजी हा निकाल दिला होता. त्याविरुद्ध सरकारने केलेल्या अपिलाची सुनावणी करताना न्यायाधीश रणपिसे यांनी निकालपत्रात लिहिलेले बोलीभाषेतील शिवराळ शब्द न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांच्या निदर्शनास आले. अपिलावरील निकालाच्या सुरुवातीसच खंडपीठाने याची नोंद केली आणि न्यायाधीश रणपिसे यांचा नावानिशी उल्लेख करून तीव्र नापसंती व्यक्त केली.

खंडरपीठाने म्हटले की, खासकरून फिर्यादी बलात्कारपीडितेच्या साक्षीदार म्हणून नोंदलेल्या जबानीत आणि नंतर त्या जबानीचे निकालपत्रात विश्लेषण करतानाही न्यायाधीश रणपिसे यांनी हे शिवराळ शब्द पुन्हा वापरले आहेत. खरे तर पीडित महिलेने मराठीत साक्ष देताना स्त्रीसुलक्ष लज्जा सांभाळत ‘वाईट कृत्य केले’ व ‘वाईट काम करून माझी इज्जत लुटली’ असे सांगितले होते. परंतु या मराठी साक्षीचे इंग्रजीत भाषांतर करताना न्यायाधीशांनी ‘इज्जत लुटणे’ यासाठी ‘एफ’ या इंग्रजी आद्याक्षराने सुरू होणारा इंग्रजी शब्द पुन्हापुन्हा वापरला आहे. वास्तविक हा शब्द बोलीभाषेतील आहे व तो शिवी म्हणून वापरला जातो याचेही भान त्यांना राहिले नाही.

महादू शिंदे या आरोपीने त्याच्या चुलतसुनेवर घरातच बलात्कार केल्याच्या आरोपावरून खटला भरला गेला होता. उच्च न्यायालयाने काही शिवराळ शब्द वापरले म्हणून सत्र न्यायाधीशांबद्दल नापसंती व्यक्त केली तरी त्यांनी महादूला निर्दोष सोडण्याचा निकाल मात्र योग्य ठरवून सरकारचे अपील फेटाळले. फिर्यादी महिलेचे कथन न्यायमूर्तींनी अविश्वसनीय मानले व संशय कितीही प्रबळ असला तरी तो नि:संशय पुराव्याची जागा घेऊ शकत नाही, असे म्हणत महादूला निर्दोष ठरविले.

ही बातमी पण वाचा : जावेद अख्तर बदनामी खटल्यात कंगनाचा सत्र न्यायालयात अर्ज

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER