
मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अय्युब शेकासन यांच्यातर्फे करण्यात आली आहे. अय्युब शेकासन याबाबत मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना पत्र लिहिलं आहे.
घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड हा पूर्व उपनगरातील महत्वाचा दुवा आहे. हा उड्डाणपूल मुंबई महानगरपालिकेचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई महानगर पालिकेच्या सर्वात मोठ्या उड्डाण पुलाचे निर्माण महापालिकेच्या एम-पूर्व विभागातंर्गत केले जात आहे. सध्या घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड गोवंडी या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. हा उड्डाणपूल लवकरच तयार होण्याची शक्यता आहे. या निर्माणाधीन उड्डाणपुलाला शरद पवार यांचे नाव द्या, अशी पुरजोर मागणी अय्युब शेकासन यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोठे योगदान दिले आहेत. शरद पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करण्यासाठी पालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अय्युब शेकासन यांनी केली आहे. या मागणीवर पालिकेच्या वतीने सकारात्मक विचार होऊन लवकरच ही मागणी पूर्णत्वास येईल. याची मला खात्री आहे, अशी अपेक्षा अय्युब शेकासन यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला