‘निर्बंधाच्या नावाखाली कडक लॉकडाऊन का? काँग्रेस मंत्र्यानेच मुख्यमंत्री ठाकरेंना सुनावले

Uddhav Thackeray - Yashomati Thakur - Maharastra Today
Uddhav Thackeray - Yashomati Thakur - Maharastra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाची (Corona) वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी ‘ठाकरे’ सरकारने राज्यात सरसकट लॉकाडऊन जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयाचा सरकारमधील काँग्रेस मंत्र्यानेच विरोध केला आहे. अमरावतीतील रुग्ण संख्या घटलेली असतानाही अमरावतीत लॉकाडाऊन लागू करण्यात आल्याने त्याला अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुरजोर विरोध केला आहे. रुग्णसंख्या कशी घटली याची आकडेवारीच देऊन ठाकूर यांनी ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहे.

राज्यात सरकसकट लॉकडाऊन (Lockdown) लागू केल्यानंतर मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून अमरावतीतील आकडेवारीसह कोरोना परिस्थिती सांगितली आहे. कोणताही अभ्यास न करता अमरावतीतही लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्याच महिन्यात जिल्ह्यात लॉकडाऊन झाला होता. त्याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे रुग्ण संख्याही प्रचंड घटली. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असताना जिल्ह्यात परत लॉकडाऊन का? असा प्रश्न ठाकूर यांनी केला आहे.

काय आहे पत्रात?

यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना तीन पानी पत्रं लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी १५ फेब्रुवारीपासून ते ५ एप्रिलपर्यंतची अमरावतीतील कोरोना रुग्णांची संख्या दिली आहे. तसेच १५ फेब्रुवारीपासून ते ५ एप्रिलपर्यंतचा दररोजचा पॉझिटिव्हीटी रेटही दिला आहे. अमरावतीत कोरोना रुग्ण वाढल्यानंतर बाजारपेठा, मॉल्स, मार्केट बंद ठेवण्यात आले होते. तसेच जीवनावश्यक सेवा सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत सुरू ठेवण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दररोज ५०० ते ७०० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, ३० मार्चनंतर या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सध्या ही रुग्णसंख्या २०० ते २५० पर्यंत आली आहे. मात्र, तरीही मंत्रालयातून आदेश आल्यानंतर जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, मार्केटस आणि मॉल्ससह सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. जलतरण तलाव, वॉटर पार्क, व्हिडीओ गेम पार्लर, मनोरंजन पार्क, क्लब, व्यायामशाळा, आदी सर्व गोष्टीही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

या सर्व आस्थापना आणि विक्रेत्यांनी लॉकडाऊन शिथिल करण्याची विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. तेव्हा व्यापारी वर्गाने त्याला चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली लक्षणीय घट आणि जिल्ह्यात यापूर्वी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात यावा. तसे आदेशच आपण काढावेत, अशी मागणी ठाकूर यांनी या पत्राद्वारे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button