“ताणाचे धनुष्य ताणावे जरा जपून !”(भाग तीन)

Stress

फ्रेंड्स ! एकूणच ताण आणि तणाव आपला पिच्छा सोडत नाही हे नक्की .पण मुळात ते कोठून निर्माण होतात ते आता कळले. आपले स्वतःचे विचार ,भावना ही महत्त्वाची उगमस्थाने !तर काही विशिष्ट वयानुरूप येतात, काही भूमिकांमधून ,तर काही व्यावसायिक, करिअर, नोकरीतून सुद्धा उद्भवलेले असतात. काही कौटुंबिक घटनांमधून , संघर्षातून त्रास देतात . काही घटना आपल्या आजूबाजूला घडतात .दरोडे ,हिंसाचार तर काही नैसर्गिक आपत्ती, पूर ,वादळ , भूकंप आणि साथीचे रोग इत्यादी.

A) त्यापैकी आपण विचारांवर काम करण्याच्या पद्धती .जसे की “विवेकी विचार प्रणाली” मागील लेखांमध्ये बघितली. यानुसार

१) स्वतःचा विनाशर्त स्वीकार !
२) इतर व्यक्तींचा विनाशर्त स्वीकार !
३) आजूबाजूच्या परिस्थितीचा विनाशर्त स्वीकार ! ही त्रिसूत्री काम करतेच करते.

आपल्या संस्कृतीत डोकावून पाहिलं तरी आपल्याला हेच दिसतं .आपली संतपरंपरा हेच आपल्याला सांगते . संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराजांना ,लोकांनी कमी त्रास नाही दिला. तुकाराम महाराजांनाही परिस्थिती खूप अनुकूल नव्हती. पण ते या सगळ्याच्या पार जाऊन आपल्या ध्येयाला म्हणजे ईश्वरप्राप्तीला वाहून घेऊ शकले. आपण संत नक्कीच नाही आहोत.मान्य !

पण समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक बघितले ,तर लक्षात येतं की ते सगळे श्लोक त्यांनी” नको रे मना” किंवा “मना सज्जना “असे स्वतःच्या मनाला उद्देशून लिहिले आहेत. समोरच्याला शिकवण्यासाठी नाही .ते आता आपल्याला पटतात म्हणून आपण ते स्वीकारतो, अभ्यासतो.

म्हणजे या संतांनी देखील *माझ्या हातात असलेल्या आणि माझ्या हाताबाहेरच्या, माझ्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टीं मधील फरक* चांगल्या प्रकारे समजून घेतलेला दिसतो.त्यामुळेच दुसऱ्यांना बदलायचा प्रयत्न न करता स्वतःला बदलण्यावर focus केलेला दिसतो .म्हणूनच ते स्वतःला सांगतात की “नको रे मना क्रोध हा खेदकारी “असे सांगतात .ते असे नाही म्हणत ,”त्यादिवशी समोरची व्यक्ती असे वागली, असे शब्द वापरले म्हणून माझा मूड गेला !मी ट्रिगर झाले/ झालो.” आणि त्यांनी स्वतःलाही दोष दिलेला नाही. खरे तर एवढे महान संत असताना ,की ज्यांचा सल्ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज घेत असत. त्यांनीही स्वतःला मी अत्यंत शहाणा, सर्वगुणसंपन्न असे न समजता स्वतःला शिकवण्यातही कुठलाही कमीपणा वाटू दिला नाही.

म्हणूनच समोरची व्यक्ती ,परिस्थिती जशी असेल अशी स्वीकारून, आत्मपरीक्षणाच्या मार्गाने स्वतःला ओळखून ,स्वतः मध्ये बदल करणे, स्वतःचे गुणदोष पारखून बघणे ,स्वतः चा स्वसंवाद अभ्यासणे आणि आपल्या विचारांवर काम करून विवेकी विचार प्रणालीचा वापर करत, विचार भावना आणि कृतींमध्ये बदल घडवून आणणे हा झाला एक भाग !

B) ताणाशी समायोजन : आपण मागच्या लेखात उदाहरण बघितलं ,त्याप्रमाणे विविध व्यक्तींची ताणाशी जुळवून घेण्याची कुवत वेगवेगळी असते. काही लोक जरा अडथळा आला तरी अस्वस्थ होतात. पण अशाही काही व्यक्ती असतात की ज्या समोरच्या आव्हानांचा आपल्या वैयक्तिक व सामाजिक संसाधनांचा वापर करून योग्य प्रकारे मुकाबला करतात. प्रतिकूल घटनेला व्यक्ती कशी प्रतिक्रिया देते यावर समायोजन शैली ठरते.

कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक पद्धतीने सुद्धा तणावाचे समायोजन केले जाते. नकारात्मक समायोजनात मद्याचा दुरुपयोग वा अवलंबित्व ,धूम्रपान , अमली औषधे, अतिरिक्त अन्नसेवन, पलायनवाद म्हणजे प्रत्यक्ष ताणाला सामोरे न जाता टीव्ही बघणे ,दिवास्वप्ने बघणे ,निरनिराळ्या औषधांचा वापर करणे ,तसेच ताणाला काही वेळेला अतिरिक्त उत्साहाने प्रतिक्रिया दिली जाते. म्हणजे उगीचच निष्काळजीपणें ,अनिर्बंध मौजमजा करणे, ताणाच्या परिस्थितीकडे डोळेझाक करणे.काही वेळा हा ताण वैयक्तिक पातळी सोडून ,निराश व वैतागलेली व्यक्ती, ताण भावना आपला जोडीदार किंवा मुले यांच्यावर काढते. घरांमधील स्त्रियांना होणारी मारहाण, मुलांना मिळणारी वाईट वागणूक ,आदीं वर्तनाचे प्रकार बरेचदा ताणाला दिलेल्या हानिकारक प्रतिक्रिया असतात .याशिवाय इतरांना दोष देणे, अति जास्त काम करणे हेही मार्ग अवलंबिले जातात.

ताण सकारात्मक पद्धतीने कमी करण्यास काय करता येईल? तर

१) स्व संवादाचे योग्य व्यवस्थापन. जे आपण सुरुवातीला बघितले आहे.२) शारीरिक ताण प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी श्वसन क्रियेवर नियंत्रण ठेवणारी श्वसन पद्धती रिलॅक्सेशन तंत्र शिकून घेणे.३) कृतींचे योग्य व्यवस्थापन–यामध्ये ऐकण्याची पद्धत ,जास्तीत जास्त पद्धतशीर करणे. म्हणजे” गुड लिसनर “बनणे, हावभाव, देहबोली याबरोबरच “बिटवीन द लाईनचे “अर्थ ऐकायला शिकणे. किंवा बरेचदा समोरच्या व्यक्तीचे विधान हे केवळ” एक वाक्य” या पद्धतीने घेणेही आवश्यक असते .बरेचदा आपल्या मनातील गृहीत अर्थ, पूर्वग्रह दृष्टिकोन आपण त्या मागे लावतो व ताण वाढतो.४) आपल्या शारीरिक तब्येतीत सुधारणा, फिजिकल फिटनेस असणे हेही ताणाला आपण कसे तोंड देतो ते ठरवत असते. त्यासाठी योग्य आहार ,व्यायाम , झोप ,विहार, आनंददायक कृती यांची काळजी घ्यावी.५) आपल्याकडे समायोजना साठी काय काय साधने उपलब्ध आहेत जसे की समाजाचा म्हणजे मित्रमंडळी आणि नातेवाईकांचा पाठिंबा , पैसा, आपली श्रद्धास्थाने यांचाही निश्चितपणे उपयोग होतो.

C) नेमकी ताणा मागील समस्या कोणती ?तेच नेमके समजून घ्यावे. म्हणजे बरेचदा एखादी व्यक्ती तिच्या वागणुकीतील बदलासाठी कामाचा व्याप वाढला आहे ,थकव्यामुळे झोप लागत नाही, अशी तक्रार करते. तिचे धूम्रपान ही वाढते. वास्तवात व्यक्तीला बढती नाकारल्याने आलेले नैराश्य आणि महत्त्वकांक्ष्येवर फिरलेले पाणी, हे कारण असते .ते ती व्यक्ती स्वतः मान्य करत नाही आणि इतरांनाही मान्य होऊ देत नाही.

D) काही संशोधकांनी “ताण दैनंदिनी”स्ट्रेस डायरी लिहिणे हा उपाय सुचवला आहे. प्रत्येक दिवसाच्या शेवटी रात्री झोपण्यापूर्वी ,साधारण दोन ते चार आठवडे पर्यंत व्यक्तीने तिला ज्यामुळे ताण निर्माण झाला अशा दिवसभरातील घटनांची यादी बनवावी, त्यापुढे त्याच्याशी संबंधित कोण व्यक्ती होते ?त्याचीही नोंद लिहावी .परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्यक्तीने काय कृती केली? तिला त्यावेळी काय वाटलं ?(फिलिंग) किंवा पुढे जाऊन त्यावेळी तिच्या मनात कोणते विचार (थॉटस) आले किंवा काय धारणा होत्या? समजुतीची पद्धत काय होती ?याची पण नोंद करावी.

E) धारणांची पुनर्मांडणी . यामध्ये चुकीच्या धारणा ,समजुती ,पर्सेप्शन्स समजून घेऊन, सहेतुक स्वसंवाद बदलावा .त्याचा सराव, पुनरावृत्ती करून ,नवीन स्वसंवादाला नैसर्गिक विचार प्रक्रियेचा भाग बनवण्यात यावा.

फ्रेंड्स ! थोडक्यात ताणाचे धनुष्य ताणावे ,पण जरा जपूनच ह ! हे आपल्याला आता छानच कळले आहे.so be cool !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

ही बातमी पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER