स्ट्रेच मार्क्सला करा छुमंतर…

strech marks

स्ट्रेच मार्क्स हे एक प्रकारचे वण असून, त्वचा ताणली जाऊन मग एकदम सैल पडल्याने ते उद्भवतात. स्ट्रेच मार्क्स शरीरावर जास्त करून कंबर, पोट, मांड्या, दंड, पाठ, इत्यादी भागांमध्ये उद्भवतात. स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः बाळंतपणानंतर स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. वजन कमी झाल्याने पण त्वचा सैल पडून त्यावर स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात. आजकाल बाजारामध्ये स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी अनेक मलमे, तेले उपलब्ध आहेत. पण या रासायनिक क्रीम्स किंवा तेलांचा वापर करण्यापेक्षा घरच्याघरी काही सोप्या उपायांचा अवलंब करून स्ट्रेच मार्क्स घालविता येऊ शकतात. ह्या सर्व उपायांमध्ये वापरले जाणारे सगळे पदार्थ संपूर्णपणे प्राकृतिक असल्याने त्यांच्यापासून त्वचेला कुठल्याही प्रकारचा अपाय होण्याची शक्यता अगदी कमी असते.

थोडीशी साखर, ऑलिव्ह ऑइल, आणि एका लिंबाचा रस मिसळून स्क्रब तयार करावा. हा स्क्रब स्ट्रेच मार्क्स वर लाऊन दहा मिनिटांपर्यंत चोळावा. त्यानंतर कोमट पाण्याने पुसून घेऊन स्क्रब काढून टाकावा. बटाट्याच्या रसामध्ये त्वचेवरील पेशींना पोषक अशी तत्व असतात. तसेच नवीन पेशी तयार होण्यासाठीही बटाट्याचा रस उपयुक्त आहे. एका बटाट्याच्या गोल चकत्या कापून घेऊन त्या चकत्या स्ट्रेच मार्क्स आलेल्या ठिकाणी चोळाव्या. त्या चकत्यांचा रस पाच ते दहा मिनिटे स्ट्रेच मार्क्स वर तसाच राहू देऊन नंतर कोमट पाण्याने पुसून घ्यावा.

strech marks

स्ट्रेच मार्क्स घालविण्याकरिता एरंडेल अतिशय उपयुक्त आहे. एरंडेल स्ट्रेच मार्क्स वर लावून सावकाश गोलाकार मालिश करावी. साधारण पंधरा ते वीस मिनिटे मसाज केल्यानंतर स्ट्रेच मार्क्स वर एक पातळ सुती कपडा ठेवावा आणि हिटिंग पॅड च्या मदतीने शेक घ्यावा. हा उपाय जितके वेळा करता येणे शक्य असेल तितक्या वेळेला करावा. त्यामुळे साधारण महिन्याभरात स्ट्रेच मार्क्स नाहीसे होतना दिसू लागतात. तसेच अॅलो व्हेरा किंवा कोरफड ही स्ट्रेच मार्क्स घालाविण्याकरिता उत्तम समजली जाते. पण बाजारातील तयार अॅलो व्हेरा जेल वापरण्यापेक्षा कोरफडीचा ताजा गर वापरणे जास्त चांगले. कोरफडीमधील गर काढून घेऊन स्ट्रेच मार्क्स वर लावावा. हा गर स्ट्रेच मार्क्स वर दोन ते तीन तास लावून ठेवावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने पुसून टाकावा. जर्दाळूंची पेस्ट बनवून ती स्ट्रेच मार्क्स ला लावल्याने ही स्ट्रेच मार्क्स नाहीसे होण्यास मदत मिळते. दोन ते तीन जर्दाळूंच्या बिया काढून टाकून ते जर्दाळू बारीक वाटून घेऊन त्याची पेस्ट तयार करावी. हे पेस्ट स्ट्रेच मार्क्सवर लावून वीस मिनिटे राहू द्यावी. त्यानंतर कोमट पाण्याने पुसून टाकावी. या घरगुती उपायांचा अवलंब केल्याने स्ट्रेच मार्क्स निघून जाऊन त्वचा नितळ आणि चमकदार बनेल.