मटणाच्या दरावरून कोल्हापुरात तणाव

Mutton Shop

कोल्हापूर :- तांबड्या-पांढर्‍या रश्श्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरमध्ये सध्या मटणाच्या दरावरून वातावरण चांगलेच तापू लागले आहे. कसबा बावडा येथून मटण दरवाढीच्या विरोधात पडलेल्या ठिणगीचा शहरासह ग्रामीण भागातही आता धूर निघू लागला आहे. मटणासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे.

येथील तांबडा-पांढरा रस्सा तर कोल्हापूरची खासियत आहे. सर्वांनाच त्याने भुरळ घातली आहे. कोल्हापुरातील लोक तर खवय्ये आहेतच; पण त्याचबरोबर कोल्हापुरात पर्यटक आला आणि तो मांसाहार करत असेल तर प्रथम तांबडा-पांढरा रस्सा चांगला कुठे मिळतो, याची चौकशी करतो.

त्यामुळे मांसाहारी हॉटेलची जाहिरात करतानादेखील तांबडा-पांढरा रस्सा याचा हमखास उल्‍लेख केला जातो आणि ही सर्व हॉटेल्स फुल्‍लदेखील असतात. कोल्हापुरातील मटणाला चव वेगळीच असते. विशेषत:, ग्रामीण भागातील मटण अधिक चांगले मानले जाते. शहरामध्ये पूर्वी महापालिकेच्या कत्तलखान्यामध्ये बकरी कापून शहरामध्ये ते मांस पुरविले जायचे; पण गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचा कत्तलखानाच बंद असल्याने मटण विक्रेते आपल्या दुकानांतच बकरी कापतात.

मटण दरवाढ विरोधात शिवसेना

दरवर्षी साधारणपणे वर्षाअखेरला डिसेंबरमध्ये मटण विक्रेते मटणाचा दर वाढवत असतात. यावेळी मात्र ऑक्टोबरपासूनच त्यांनी मटणाचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: शहरातील मटण विक्रेत्यांनी हे दर वाढविले आहेत. ग्रामीण भागात मात्र मटणाचे दर जवळपास ७० ते १०० रुपयांनी कमी आहेत. मटणाचा दर ५६० ते ५८० रुपयावर नेल्याने त्याला नागरिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली.

मटण विक्रेत्यांच्या मते पूर्वी बकर्‍याच्या चमड्याला दर चांगला होता. मात्र सध्या चमड्यापासून तयार होणार्‍या वस्तूंसाठी पर्याय उपलब्ध झाल्याने या चमड्याचे दर उतरले आहे. शिवाय शेजारील राज्यातून बकर्‍यांना मागणी वाढल्यामुळे आणि मागेल ती किंमत बकरी मालकांना मिळू लागल्याने बकर्‍याचे दर वाढले असल्याचे सांगितले जाते.

मात्र कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात विक्री होण्याच्या मटणाच्या दरात जवळपास १०० रुपयांची तफावत आढळू लागल्यामुळे शहरातील नागरिकांनी मटणाच्या वाढीव दराला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील मटणाच्या किमती वाढल्याचे पाहून ग्रामीण भागातील मटण विक्रेत्यांनीदेखील मटणाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील लोक त्याला विरोध करू लागले आहेत.

मटण दरवाढीच्या विरोधात पहिली ठिणगी पडली ती कसबा बावडा येथून. त्यानंतर आता शिवसेनाही या मटण दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरू लागली आहे. त्यामुळे मटण दरवाढीच्या विरोधात सध्या सर्वत्र वातावरण चांगलेच तापू लागले आहे.