‘मनाचा खंबीरपणा’ कोरोनाला हरविण्याचे चौथे सूत्र; इंदुरीकर महाराजांचे आवाहन

indurkar Maharaj - Maharashtra Today

अहमदनगर : ‘हात वारंवार धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीसोबत मनाचा खंबीरपणा ठेवणे, हे कोरोनाला हरविण्याचे चौथे सूत्र बनले आहे. भीती आणि मनाचा दुबळेपणा हा कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे.’ असे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी लोकांना आवाहन केले. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या पुढाकाराने विखे-पाटील वसतिगृहात ४०० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करण्‍यात आले. त्याचे लोकार्पण इंदुरीकरांच्या हस्ते झाले.

इंदुरीकरांनी आपल्या खास शैलीत थोडक्यात पण प्रभावी भाषण केले. “कोरोनाच्या संकटाने मानवी जीवन क्षणिक करून टाकले आहे. या संकटामुळेच सर्वांना माणुसकी कळाली आहे. पैसा आणि संपत्‍तीपेक्षाही माणसाला देव महत्त्वाचा वाटू लागला. रुग्‍णाला माणसाची आणि समाजाची गरज वाटू लागली. आता आरोग्‍याची काळजी घेतानाच भीती आणि मनाच्‍या दुबळेपणाला दूर करावे लागणार आहे. मला कोरोना  होणार नाही, हा दृष्टिकोन नव्हे तर मी स्वत:ला कोरोना होऊ देणार नाही, हा दृष्टिकोन आपल्याला ठेवावा लागेल.” असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

यावेळी इंदुरीकरांनी विखे-पाटील कुटुंबाचे कौतुक केले. ‘विखे-पाटील कुटुंबाच्या रक्तात सेवाभाव आहे. विखे-पाटील परिवाराने सेवेचा हा गुण जोपासत या संकटात केलेले सेवेचे काम हे दैवीशक्‍तीच्‍या गुणातूनच होत आहे. कोविड सेंटरमधून रुग्‍णांच्‍या चेहऱ्यावर हसू फुलवणे हीसुद्धा एक माणुसकीची सेवा आहे.” असे इंदुरीकर म्हणाले. संस्‍थेचे चेअरमन भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्‍ण विखे-पाटील यांनी वाढती रुग्‍णांची संख्‍या आणि आरोग्‍य यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेता कोविड केअर सेंटर सुरू करण्‍यात आल्याची माहिती दिली. जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्ष शालिनी विखे-पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्‍टचे अध्‍यक्ष डॉ.राजेंद्र विखे-पाटील, शिर्डी संस्‍थानचे उप कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button