एकमेकाला रोखण्याची व्यूहरचना : तगड्या उमेदवारासाठी सर्वेक्षणाचा आधार

Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) पायाभरणी कोल्हापूर महापालिकेत झाली; मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना बंडखोरी टाळण्यासह कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी स्वतंत्र लढणार आहे. निवडणुकीनंतर हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता असली तरी राजकीय अस्तित्वासाठी भाजप-ताराताराणी आघाडीसह एकमेकाला रोखण्याची व्यूहरचना आखली जात आहे. प्रभागात तगडा उमेदवार असावा, यासाठी राजकीय पक्षांनी त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षणाचा आधार घेतला आहे. त्यामुळेच उमेदवारी जाहीर व्हावी, यासाठी इच्छुकांची घाई असली तरी नेते मात्र सावध आहेत.

महापालिका निवडणुकीची आरक्षण साेडत जाहीर झाल्यापासूनच प्रत्येक प्रभागात डझनभर इच्छुकांनी गाठीभेटी घेत अप्रत्यक्ष प्रचाराचा नारळ फोडला आहे. एकाच पक्षाकडे तीन-चार इच्छुक आहेत. आपल्यापैकी एकाला उमेदवारी मिळाल्यास पाठीशी राहण्याचे अंडरस्टॅण्डिंग त्यांनी केले आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आ. विनय कोरे, माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार धनंजय महाडिक, सत्यजित कदम आदी नेत्यांकडे इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. उमेदवारांनी इच्छुक असल्याचे नेत्यांच्या कानावर घातले आहे. अजून वेळ आहे, धीर धरा, असे सांगत नेत्यांनी ‘गॅस’वर ठेवले आहे.

तरीही प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळे आदींचे ग्रुप करून नेत्यांकडे उमेदवारी मागणीसाठी पाचारण केले जात आहे. ही निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्व वाढविणार असल्याने महापालिकेबाबत नेत्यांची व्यूहरचना ठरली आहे. काँग्रेस आणि भाजप-ताराराणी आघाडीला कोणत्याही स्थितीत स्वबळावर सत्ता आणायची आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सत्तेत सन्मानजनक वाटा हवा आहे. सत्तासोपान गाठण्यासाठी तगडा उमेदवार ही यशाची पहिली पायरी आहे. प्रत्यक्ष मतदानाअगोदर काही राजकीय जोडण्या कराव्या लागल्या तरी या तडजोडीच्या राजकारणात आपला उमेदवार कमी पडू नये, याकडे कटाक्ष आहे. यासाठी प्रभागाचा कल जाणून घेण्यासह उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यावर अनेक पक्षांचा भर आहे. त्या दृष्टीने तयारीही सुरू  झाली आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांची विधानपरिषदेची वाट निर्धोक करण्यात महापालिकेचा निकाल मोलाचा ठरणार आहे. चंद्रकांत पाटील यांना होमपिचवर कमळ फुलविण्याचे आव्हान आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अपयश धुऊन काढण्यासाठी महाडिक गट पर्यायाने ताराराणी आघाडी ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महापालिकेच्या राजकारणात किंगमेकर होण्याची आस आहे. त्यामुळे पक्षीय परिघाबाहेरच्या राजकीय जोडण्या या निवडणुकीत दिसतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER