मेंदूची अजब गजब कथा

Brain

मनुष्याला मिळालेले शरीर अवयव आणि पंचेंद्रिय या सगळ्यांवर कंट्रोल करणारा तो असतो मेंदू. म्हणूनच म्हणतात,” सिर सलामत तो पगडी पचास!” तसेच शरीर निरोगी तर जीवन सुखी होतं यात शंकाच नाही .आपण मात्र या शरीराला अवयवांना ,मेंदूला गृहीत धरलेलं असतं . शरीर, मेंदू हे एक यंत्र आहे, वर्षानुवर्ष चालू आहे आणि कधीतरी कुरकुरले तर ओईलींग करायला हवे आहे ही जाणीव लवकर होत नाही.” एवढं काय त्याच !होणारच वाढत्या वयाबरोबर काही तरी!” असं म्हटलं जातं. वास्तविक बघता आपण कुरकुराव या वयाचे नसतोही बरेचदा ! म्हणूनच मला वाटतं की दररोज सकाळी प्रत्येकाने ही कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की ,”अरे वा !माझे शरीर आणि मेंदू ठीकठाक काम करत आहेत! ” पण बहुतांशी मानवीप्रवृत्ती या असणाऱ्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून ज्या गोष्टी नाहीत त्याबद्दल कुरखुरातात. म्हणजेच हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागतात .

हे सांगण्याचा उद्देश असा आहे की हे शरीर रुपी यंत्र आणि मेंदूची कार्यपद्धती अक्षरशः तांत्रिक असल्याप्रमाणे अतिशय गुंतागुंतीची आणि नाजूक आहे .आत घडणार्‍या हजारो क्रिया ,आपल्याला जाणवतही नाही. खरंतर आपला सर्वात जवळचा आणि आपण मृत्यूपर्यंत कधीच न सोडणारा मित्र म्हणजे मेंदू त्याच्याशिवाय आपण जिवंतच राहू शकत नाही .याची क्षमता वाढत्या वयाबरोबर कमी होत असले तरी ती वाढवणे आणि टिकवणे आपल्याच हातात असतं. आज-काल बहुतांशी बऱ्याच लोकांना विस्मरणाचा प्रॉब्लेम फार लवकर पासून जाणवायला लागला आहे. अल्झायमर या आजाराचे प्रमाणही बर्‍यापैकी वाढत आहे. मध्यंतरीच्या एका लेखामध्ये कोरोना काळात व्यक्तीचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला. त्या खूप एकेकटे राहायला लागल्या. त्याचा परिणाम म्हणून विस्मरण वाढल्याचं वाचण्यात आलं होतं.

मेंदू हा कम्प्युटर पेक्षाही खरतर तल्लख आहे. तो एक हार्डवेअर आहे. ज्याचा डावा व उजवा असे दोन भाग आणि त्या अर्धगोलात मागे खाली थोडा लपलेला तो लहान मेंदू. आणि मग मन काय तर त्यात लोड केलेलं एक सॉफ्टवेअर म्हणता येईल. आपल्याला सगळ्यांना साधारण माहिती आहे की

डावा मेंदू हा शब्द विज्ञान आकडेवारी क्रमवारी, रीजनिंग ,सारासार विवेक यासारख्या गोष्टींसाठी काम करतो तर उजव्या मेंदूत सृजन, सौंदर्यदृष्टी ,भावनात्मक, संगीता, रंग ,कल्पनाशक्ती यांची केंद्र असतात. आणि लहान मेंदूमध्ये शरीराचे नियंत्रण आणि त्या हालचालींची स्मृती साठवलेली असते.
Untitled-3

याठिकाणी दोन मुद्दे महत्त्वाचे सांगायचे आहेत .

आजच्या शालेय शिक्षणामध्ये सगळ्यात जास्त वापर हा डावा मेंदू द्वारेच केला जातो. म्हणजेच एकूण बुद्धिमत्तेच्या अर्धीच बुद्धिमत्ता आपण वापरतो. खरेतर सगळ्यात उत्कृष्ट शक्ती जगातली ती कल्पनाशक्ती आहे. म्हणजे पहिल्यांदा उजव्या मेंदूमध्ये कुठल्याही कल्पना रुजाव्या लागतात. आणि मग डाव्या मेंदूने त्याला खतपाणी घालून त्या वास्तवात आणाव्या लागतात. उजवा मेंदू प्रबळ असतो त्याला डाव्या मेंदूची पुरेपूर साथ असते आणि अशी माणसं इतिहास घडवतात. दोघांच्या समतोल आतून कार्य केलं तर कल्पना प्रत्यक्षात उतरतात. परंतु शाळांमधून फक्त डाव्या मेंदू वापर होईल असे अभ्यासक्रम आखलेले असतात.

दुसरी गोष्ट आपल्या मेंदूमध्ये जेव्हा माहिती स्मरणाच्या रूपामध्ये साठवलेली असते ,त्यावेळी तीन प्रकारची स्मृती असते. एक म्हणजे दृष्टी स्मृती यात साठवलेली माहिती 65 टक्के असते. म्हणजे पाहून शिकणाऱ्या व्यक्ती इतर दोन स्मृतींच्या तुलनेत पटकन शिकतात. दुसरी श्रवण स्मृती. ऐकण्यातून साठवलेली माहिती वीस टक्के असते आणि तिसरी कृतीस्मृती ! म्हणजे आपण कृती करून, सराव करून जी मिळतो. ती 15 टक्के माहितीसाठी उपयोगी होऊ शकते. याचे वैशिष्ट्य आहे की ती जास्त काळ टिकते कारण त्याचा वारंवार सराव करावा लागतो. सराव केल्यामुळे ती अल्पकालीन स्मृतीतून दीर्घकालीन स्मृतीमध्ये जाते.

ही बातमी पण वाचा : प्रश्न सोडविण्याचाही प्रश्नच !

म्हणूनच शाळेमधली अभ्यासक्रम हा फक्त शिक्षकांनी शिकवून मुलांनी ऐकणे, यापेक्षा प्रत्यक्ष त्या अभ्यास विषयाच्या ठिकाणी अनुभव घेणे आणि आपल्या हातांनी काहीतरी कृती करणे या दोन गोष्टींमुळे जास्त चांगले अध्ययन होऊ शकते.

तिसरी गोष्ट विस्मरणच्या बाबतीत . मुळात मेंदू बाबतचा आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असणे खूप आवश्यक असते. बरेचदा आपण हे पटकन कबूल करून टाकतो, “अग्गोबाई !माझ्या लक्षात राहिलं नाही” किंवा “वाढदिवसाचं विश करायचं विसरून गेले.” असं बोलून आपण त्याच्या कार्यक्षमतेबाबत शंका उत्पन्न करून त्याचा अपमान करत असतो. त्या ऐवजी माझ्या सगळे लक्षात आहे असं म्हणून जर त्याला पाठबळ दिलं तर त्यालाही प्रेरणेची आवश्यकता असतेच की ! आपण सकारात्मक शक्ती पुरवून प्रोत्साहन दिलं तर मेंदू चिरतरुण राहू शकतो. आपण सर्व बुद्धीचा काहीच वापर करत नसू तर तिच्यावर एखाद्या हत्यारांवर धूळ बसून जसा त्यावर गंज चढतो, त्याप्रमाणे बुद्धीलाही गंज चढतो. ज्याप्रमाणे कारागीर आपल्या हत्यारांवरची धूळ साफ करतो, तेलपाणी करतो,त्याप्रमाणे आपण जर बुद्धी सतत वापरात ठेवली ,बुद्धिमत्तेला सतत बौद्धिक चालना देत राहील, तर तिची क्षमता वाढेल. स्नायूंसाठी ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम करतो आणि शरीर मजबूत करतो तसेच मेंदू हा शरीरातील हाड आणि स्नायू सारखाच आहे .अगदी तसंच जर बुद्धीला जास्तीत जास्त चालना दिली आपण कायम कृतिशील राहून निरनिराळ्या व्यापामध्ये स्वतःला सामील करून घेतलं तर बुद्धीची तल्लखता वाढते. शिकलेल्या ज्ञाना पैकी जवळजवळ पन्नास टक्के ज्ञान दुसऱ्या दिवशी आपण विसरत असतो आणि एक महिन्यानंतर त्यातील केवळ दोन ते तीन टक्केच मेंदूची स्मरण पातळी शिल्लक राहते. म्हणूनच वारंवार केली जाणारी उजळणी गरजेची असते. थोडक्यात मेंदूच्या डेक्सटॉप वर आपल्याला पासवर्ड टाकावा लागतो तेव्हा तो सकारात्मक पासवर्ड टाका .Yes! I Can . त्यामुळे मेंदू उत्तेजित होऊन कामाला लागेल. बरेच जण विचार करत असतात, “हे काम माझ्या कडून होणारच नाही ! आता या वयात कसं करणार हे सगळं “. पण जर पासवर्ड बदलला तर बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह व्हायला लागतील.

ही बातमी पण वाचा : तिची व्यग्रता आणि अपराधी भाव

लहान मुलांना बरेच वेळा अनेक प्रश्न पडतात .खूप प्रश्न विचारून ते भंडावून सोडतात. एक तर आपल्याला त्यांची उत्तरे द्यावी लागतात आणि जर कोणी पळ काढला तर ते त्यांच्या तर्कशक्ति ने त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. जर आपण मुलांना सांगितलं की तिकडे जाऊ नको किंवा त्याला हात लावू नको की ते हमखास तीच कृती करतात. कारण त्यांचा मेंदू हा शोधक वृत्तीचा आणि नवीन नवीन गोष्टी लवकर शिकणारा असतो. पण बरेच वेळा नकारात्मक विचार करणारे प्रौढ असा प्रश्न स्वतःला विचारत नाहीत, कुठल्याही गोष्टीत खोलात जायला बघत नाहीत. चिकित्सक बनत नाहीत. थोडक्यात डोक्याला त्रास करुन घेत नाहीत. पण या सगळ्याचा परिणाम हा स्मृतीवर होऊ शकतो.

आपला मेंदू कार्यरत ठेवण्यासाठी अजूनही काही महत्वाचे :-

  • बरेच वेळा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये करप्ट फाईल आपण पाहतो ्या डिलीट किंवा क्‍लीन करतो आपल्या मेंदूचे ही तसेच आहे. मनात साठलेल्या नकारात्मक गोष्टी किंवा नको असलेले पण वारंवार रिवाइंड होणारे प्रसंग याच्या साठ्यातून व्हायरस घुसतो. मग काय करायचं तर आत्मपरीक्षण करायचं, यासाठी एखाद्यासाठी शांत बसायचं, लांब फिरून यायचं किंवा डायरी लिहायची. थोडक्यात नको असलेल्या गोष्टी आपल्या या मेंदू वर भार टाकत असतात त्यातून मुक्त होऊन आवश्यक त्या गोष्टी स्मरणात ठेवायच्या.
  • सध्याच्या काळात मोबाईल ही काळाची गरज बनून राहिला आहे . या मोबाईलचा विपरीत परिणाम आपल्या मेंदूवर व्हायला लागला आहे. आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होते. सतत फोन चेक करणे एसएमएस आलाय का बघणे ?स्मरणशक्ती एकाग्रता कमी होणे .फावल्या वेळेत मोबाइलच्या इतर फंक्शनमध्ये अडकणे, मेंदूला रिफ्रेश होण्याला वेळ न मिळणे .चिडचिडेपणा अशा त्रासांना सामोरे जावे लागते त्यामुळे मोबाईलचा अतिवापर नकोच.
  • आयुष्यात संगीत हा माणसाला आनंदी उत्साही अंतर्मुख करणारा घटक आहे. संगीत ऐकणं यामुळे मेंदूचे कितीतरी भाग stimu-let होतात. विविध राग विविध आजारांवर उपयोगी असल्याबद्दलचे संशोधन झालेले आहे .म्युझिक ही एक थेरपी म्हणून उपयोगात येते आहे. त्यातल्या त्यात स्वतःचा आवाज हा आपल्या मेंदूला खूप जास्त प्रमाणात आवडतो असेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे गाणे गुणगुणणे, म्युझिक ऐकणे मग यात सुगम शास्त्रीय किंवा वाद्य संगीत कुठलंही ऐकावं या ने स्मरणशक्तीवर एकाग्रतेवर निश्चित पणें परिणाम होतो.
  • याशिवाय समतोल आहार पुरवायचा असेल तर सकस मनोरंजन असावे. निवडक मालिका बघाव्या.
  • वाचन करणे, आवडलेले मुद्दे अधोरेखित करणे ,आपल्याला सुचलेल्या कल्पना बाजूला लिहून ठेवणे. इंग्लिश शब्दांचे अर्थ डिक्शनरी शोधणे याने मेंदूला खाद्य मिळते.
  • पहाटे लवकर उठल्याने मेंदूला फ्रेश वाटून मेंदू दुप्पट क्रियाशील होतो. विविध कोडी सोडवणे यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो बुद्धिबळ खेळणे हाही एक चांगला व्यायाम, सतत काहीतरी प्रेरणा देत राहणे, चांगले सिनेमे, सेमिनार. याशिवाय दीर्घ श्वसन प्राणायम, निसर्ग सहवास यामुळे विस्मरण होण्याअगोदर पासूनच रोखता येते.

ही बातमी पण वाचा : नको व्यर्थ चिंता…

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER