राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा संघाबाबत अजब आदेश, ‘विशिष्ट गणवेशात मदतकार्य करता कामा नये’

Maharashtra Today

कऱ्हाड : कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक कार्य करताना विशिष्ठ गणवेशात काम करणे बरोबर नाही. उपजिल्हा रूग्णालयात जो प्रकार झाला तसा प्रकार पुन्हा होता कामा नये, अशी तंबी पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil)यांनी उपजिल्हा रूग्णालयात दिली. पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS)नाव न घेता त्यांनी गणवेशात येवून रूग्णांची सेवा करण्याचा प्रकार योग्य नसल्याचे म्हणत एकप्रकारे आदेशच देऊन टाकला. पुन्हा असा प्रकार घडू नये याची काळजी घेण्याची सक्त सुचनाही उपजिल्हा रूग्णालयातील अधिकाऱ्यांना त्यांनी केली आहे.

कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात एका कार्यक्रमासाठी पालकमंत्री पाटील आले असता त्यांनी लसीकरणाची माहिती जाणून घेतली. तहसीलदार अमरदीप वाकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, नगरसेवक सौरभ पाटील उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी सुचना केल्या. युवक काँग्रेस व संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या प्रकाराचा उल्लेख करताना पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नामोल्लेख टाळला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सामाजिक संघटनांना सेवा देण्यास काहीही हरकत नाही. मात्र, विशिष्ठ गणवेशात येऊन कार्य करण्याची गरज नाही. परवा जो प्रकार झाला. तो अत्यंत चुकीचा आहे. पोलिस, डॉक्टरांनी गणवेश घातला पाहिजे. मात्र सामाजिक काम करणाऱ्यांनी गणवेश घालण्याची गरज नाही. तसे पुन्हा होऊ नये, याची काळजी घ्या. मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही. पालकमंत्री पाटील यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना कडक शब्दात सुचना दिल्याने यंत्रणाही चकित झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button