अरे माणसा माणसा….. कधी होशील माणूस ?

परवा औरंगाबाद मध्ये घडलेल्या घटनेने सगळ्या औरंगाबादकरांना नि:शब्द केले आहे. भयंकर अस्वस्थ करणारी घटना आहे ही ! त्यावेळी अगदी बहिणाबाईंच्या कवितेतील वरील ओळी आठवल्या.” अरे माणसा माणसा… कधी होशील माणूस ?”

शहरातील एका अपार्टमेंटमध्ये मेहंदळे म्हणून एक वयोवृद्ध जोडपं रहात होतं. त्यापैकी त्यांच्या पत्नि या मागील वर्षापासून अर्धांगवायूने आजारी होत्या. आणि वाल्मीतून अभियंता म्हणून निवृत्त झालेले त्यांचे पती श्रीयुत मेहंदळे. त्यांनाही सोरायसिसचा विकार होता. ते स्वतः पत्नीची पूर्ण काळजी घेत होते, सेवा करित होते. आणि घरातली सगळी कामेही सांभाळत होते. दूध, औषधे घरापासूनच्या जवळचे दुकानदार घरपोच आणून देत असत. त्याचप्रमाणे मेहेंदळे आजोबा येता-जाताना आजूबाजूच्या लोकांशी हसून, खेळून बोलत असा ही बातमीमध्ये उल्लेख आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांच्या फ्लॅट मधून दुर्गंधी येत असल्याने शेजार्‍यांनी पोलिसांना बोलावले. दार तोडून आत प्रवेश केला असता दोघांचेही मृतदेह दृष्टीस पडले. त्यापैकी आजोबांचा आठ दिवसापूर्वी व त्या आजींच्या थोडा नंतरचा मृत्यू झाल्याचे जाणवत होते. त्यांची मुलगी अनेक वर्षांपासून अमेरिकेत आहे, तिने येण्यास असमर्थता दाखविल्याने शवविच्छेदनानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना अग्नी दिला. मृत्यूचे कारण अजून निश्चित झालेले नाही. शेजार्‍यांच्या सांगण्यावरून कोरोनाच्या भीतीने ते एवढ्यात दरवाजे बंद ठेवत असत.

दिल्ली, मुंबई, पुणे या सारख्या शहरांमधून घडू शकते अशी घटना चक्क औरंगाबादमध्ये घडावी ? ही औरंगाबादची प्रगती म्हणावी की अधोगती ? अजून पायाला चाके लावून फिरण्याएवढी औरंगाबादची जीवनशैली वेगवान झालेली नाही. मग अशी घटना घडतेच कशी ?

घटना घडल्या नंतर अनेक तर्कवितर्क, प्रश्न, शंका उभे राहिले. आठ दिवसात दूधवाला, कामवाली बाई आले नाहीत का? नातेवाईक किंवा मुलीने सुद्धा आठ दिवसात एकदाही फोन केला नाही का? त्यांचे इतरांशी फार जवळचे जिव्हाळ्याचे संबंध नव्हते वगैरे वगैरे. अशा अनेक चर्चा झाल्यात, आणि होतीलही ! पण थोड्या दिवसांनी लोक विसरतील आणि हौसे, हौसेने पायाला अधिक गती असणारी चाक लावून धावू लागतील. शेवटी मृत्यूचे कारण काय जे येईल ते ! पण त्यामुळे घटनेची हृदयद्रावकता कमी होत नाही. जे ही झालंय ते आमच्या साठी काळीमा लावणारं आहे हे निश्चित. मोठी शहरे ज्याप्रकारे पाश्चात्यिकरण्याच्या वाटेवर जात आहेत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून औरंगाबाद जातय का? या विचाराने मनात काहुर उठतयं .

अनेक शंका पैकी एक म्हणजे ते आजी-आजोबा कदाचित फार कुणाच्या संपर्कात राहत नसतील. काही लोक असतातही असे. पण हे या प्रसंगाचे उत्तर नाही. कदाचित ते दोघेही जण आपल्याच व्यथा नी चिंतित राहून, कुणाच्या संपर्कात राहू शकत नसतील. त्यांच्या औषध पाण्यात एवढा खर्च होत असेल की पेन्शन कदाचित कामवाली लावण्याऐवधी पूरतही नसेल. त्यामुळे कामाच्या ओझ्याखाली दबून फार जनसंपर्क ठेवण्याची त्यांची ताकद पुरत नसेल. त्यांचा स्वभाव संकोची असेल किंवा वयानुरूप आडमुठा ही असू शकतो. अंतर्मुख असू शकतो. खूप आले गेले किंवा राबता घरात नसेल, तरी हाय ! हॅलो! पुरता त्यांचा स्वभाव असल्याचे पेपर वरील बातमी नुसार वाटते.

फ्रेंडस् ! समाजात वावरताना, सलोख्याने वागताना, संबंध जोडलेले ठेवतांना ,संवाद राखण्यासाठी, सगळेजण बहिर्मुख, सोशल, आनंदी असतील असा पण कसं गृहीत धरू शकतो ? नेहमीच समोरच्याने लगेच हात समोर करावा अशी अपेक्षा रास्त असू शकते का? मला वाटतं अपेक्षा रास्तही असेल पण ती जेव्हा बरेचदा ” डिमांड ट्रॅक “वर जाते तेव्हा सुसंवादाचे मार्गच खुंटतात.

त्यातून बरोबरीचे, तरुण, यांच्यासाठी ही अपेक्षा ठीक आहे. पण वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुले यांचे ” सामाजिक पालकत्व ” घेण्याची जबाबदारी एक पालक म्हणून आपली आता येते ! तुम्हाला आठवते का ? पूर्वीच्या काळात मोठमोठे वाडे किंवा चाळी होत्या. छोट्या कॉलनी होत्या. गावे छोटी होती. तिथे एखादा मुलगा किंवा मुलगी योग्य वागत नाही, असं दिसल तर शेजारच्या काकू एक तर अायांना तरी सांगत, किंवा स्वतःला तरी जोरदार खडसावत असत. मुख्य म्हणजे हे त्या मुलांच्या आयांना चालत होतं. आज फक्त, “मी, माझे मला”चे कुटुंबामध्ये “माझा मुलगा किंवा मुलगी असं वागू च शकत नाही, तुम्हाला कशाला आमच्या प्रश्नात नाक खुपसण्याची गरज ? “असं होऊ लागलाय. हे मुलांच्या बाबतीत ज्याप्रकारे समाजाचं पालकत्व होतं, तशीच किंवा त्यापेक्षा जास्त आता वयोवृद्धांच्या बाबत “सामाजिक पालकत्वाची” प्रकर्षाने गरज आहे.

आताच्या परिस्थितीत, अनेक वर्षेपर्यंत आरोग्यपूर्ण जीवन जगत, दीर्घायुषी होणाऱ्या वृद्धांची संख्या झपाट्याने वाढते आहे. तर दुसरीकडे जागतिकीकरणाच्या निमित्ताने आपली जन्मभूमी, मातृभूमी यापासूनही अनेक अंतरापर्यंत लोक पोटासाठी, विकासासाठी जात आहेत. हे काळानुरूप घडणारच ! पण प्रश्न उभा आहे फक्त आपण, आपला मूळ गाभा, मूळ संस्कृती, भावभावना, जिव्हाळा, अटॅचमेंट का विसरतो? इतके कोरडे आपण का होतो ? आणि मग माणूस म्हणून तरी स्वतःला कसे म्हणवतो?

शेजारचा च्या आजूबाजूच्या घरात सतत डोकावून बघणे गरजेचे नाही. तेवढा वेळही नाही आणि प्राथमिकता देखील बदलल्या आहेत. पण कमीत कमी,” दोन चार दिवसात शेजारच्या काकू दिसल्या नाही एवढ्यात ! ” किंवा” आजकाल आवाज नाही येत आहे ताईंचा ! नाहीतर सारख्या धुणीभांडी वालीला ओरडाआरडा करत असतात पाणी कमी वापर म्हणून ! ” येवढ लक्षात येण्याएवढी फुरसत आपल्याला नक्की असते, आणि नसेल तर काढायला हवी.

” मला काय त्याचं !”किंवा “त्या तशाच ! कुणाकडे जाणे नाही, येणे नाही!” हे सगळं गॉसिपिंग साठी ठीक आहे. पण माणुसकी म्हणून नाही.

कॉलनीतील मैत्रिणींचा व्हॉट्सऍप ग्रुप हवाच हवा ! त्यात भलेही सुविचार किंवा इतर पोस्ट असतीलच पण महत्त्वाच्या पोस्ट हव्यात , त्या म्हणजे परस्परांच्या आणि विशेष करून वृद्धांच्या ख्यालीखुशाली विषयीच्या ! बरेचदा कुटुंब छोटी झालीत, त्यामुळे मदतीला किंवा संकटात उपयोगी पडण्यासाठी दूरचे राहणारे नातेवाईक येऊ शकत नाहीत कदाचित , पण कॉलनीतल्या अश्या मैत्रिणी उपयोगात येतात . सध्या नवरा-बायको दोन्ही पण काम करतात, घरामध्ये वृद्ध व्यक्ती एकट्या पडतात. अशावेळी त्यांना भेटी देणे किंवा फोनवरून संवाद साधणे, आवाजावरून मन ओळखणे, भावना ओळखणे हे घरी बसून नक्कीच करता येतं. यात त्यांचा सून मुलगा किंवा मुलगी जावई कमी पडतात अशी भावना नक्कीच नसावी. प्रत्येक जण आपलं कर्तव्य योग्य करण्याचा प्रयत्न करतातच.

पण कामाच्या ओझ्याखाली, हे अवघड होतं जातं. तेव्हा ही मदत नक्कीच उपयुक्त ठरू शकते.

कारण फ्रेंडस् ! आज मरण इतकं स्वस्त झालय. आणि मन हे ” डिप फ्रिजर” मध्ये ठेवून गोठलेले आहे. काल परवाच्या पेपर मध्ये एक बातमी वाचली की लहान बहिणीला धाक दाखवता दाखवता 15 वर्षाच्या मुलाचा गळफास लागून मृत्यू झाला. मृत्यू इतका स्वस्त की तो आता लुटूपुटूच्या खेळाचा ही भाग होऊन बसावा ! गळफास घेणे हा काय गमतीचा खेळ झाला ?

म्हणूनच वयोवृद्धांचे आणि मुलांचे पालकत्व सामाजिक होण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच प्रमाणे माणुसकी जागवण्याची देखील ! म्हणूनच ही प्रार्थना आठवते,
” हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे ,
माणसाने माणसाशी माणसा सम वागणे ….! हीच आमुची प्रार्थना !”

ही बातमी पण वाचा : “पालकत्वाच्या पाऊलखुणा, मराठी साहित्याच्या अंगणा !”

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक आणि सायकोथेरपिस्ट .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER