तुझं-माझं ब्रेकअप !

breakup

मध्यंतरी टीव्हीवरची ही मालिका खूप गाजली होती. ‘ब्रेकअप’ शब्द तर आजकाल फारच परिचित झाला आहे अगदी सगळ्यांना ! म्हणजे प्रेम काय, आकर्षण काय हे सगळं कळायच्या अगोदरच्याच वयात अलीकडे, अगदी तिसऱ्या, चौथ्या वर्गात प्रेम आणि ब्रेकअप (Breakup) होतात. हे बघितलं की हसावं की रडावं कळत नाही.

पण एकूणच हा प्रकार तरुण मुला-मुलींच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणाराही असू शकतो. आता हेच बघा ना ! अनुज हा २०-२२  वर्षांचा मुलगा. बारावीपासूनच तो व त्याची एक मैत्रीण बरोबर होते. त्याचे तिच्यावर प्रेम होते; पण अचानकच तिने ब्रेकअप केले . तसा कुठलाही प्रसंग घडला नव्हता. त्यामुळे तिने असे का केले हे त्याला अजूनही कळलेले नाही. त्याने विचारण्याचा प्रयत्न केला; पण तिने बोलण्याचे टाळले .नंतर वडिलांची बदली झाल्याने ती दुसरीकडे गेली. मात्र प्रचंड निराशेने अनुज थर्ड इयरची परीक्षा देऊ शकला नाही .अनेक प्रयत्न करून बघितले; पण तो त्या शॉकमधून बाहेर येऊ शकत नाही.

१९ वर्षांची सायली नर्सिंगला आहे. तिचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. त्यामुळे सायलीला एकटे वाटते, त्यांचा सहवास आणि प्रेम तिला मिळत नाही .ती पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. आई अत्यंत कडक आहे. तिला नेहमी या रिलेशनशिपबद्दल सांगावेसे वाटत होते. पण ती सांगत नाही. आता तिचे ब्रेकअप झाले आहे. तिला खूप गिल्टी वाटतं आणि आई-वडिलांची भीतीही.

सायलीसारख्या आईवडिलांचे लक्ष नसल्याने, वेळ नसल्याने, घरून पुरेसा सहवास, प्रेम नसल्याने म्हणा की त्या वयात भान न राहिल्याने म्हणा, अनेक मुली वहावत जातात आणि काही तरी फसवणूक झाल्याने ब्रेकअप होतात. खरं तर १९ व्या वर्षी मुले-मुली सज्ञान झालेली असतात. पूर्णपणे आयुष्यातील बरेवाईट कळत नसले तरी काही गोष्टी अनुभवातून कळत असतात आणि कळाव्यात.

ही बातमी पण वाचा : “नात्यांच्या जपणुकीसाठी — ‘ स्पेस ‘आवश्यक !”

पण आज खरोखरच कॉलेज वातावरणात बघितलं तर अगदी सततच, हा तिला लाईक करतो, ती पुढे आणखी कुणाला तरी लाईक करते, एकावेळीच अनेक मुलींबरोबर व मुलांवर प्रेम करणारे मुले व मुली दिसतात. त्यात एखाद्याची जास्त भावनिक गुंतवणूक समोरच्याला झेपत नाही आणि ब्रेकअप होतो.

मुळात याला प्रेम वगैरे असं काही म्हणण्यापेक्षा त्याला ‘काफ लव्ह’ किंवा ‘क्रश’ असे म्हणतात. प्रेम खूप मोठी भावना आहे . कॉलेजच्या जीवनातले प्रेम हे खरं तर फार टाईमपास असू शकतं. म्हणजे ते केवळ कॉलेज वयातील पौगंडावस्थेतील आकर्षण या स्वरूपात असतं. फार तर  ते चार-पाच वर्षे टिकतं.

आजकाल सर्वत्र को- एज्युकेशन आहे. अनेक अदरऍक्टिव्हिटीजमध्ये मुले-मुली एकत्र येतात. पूर्वी या कशाला जागा नव्हती. त्यामुळे हे असे ब्रेकअप वगैरे पण प्रश्नच नव्हते. मुळातील आजची ही एज्युकेशन सिस्टीम खरं तर अतिशय छान आहे. स्त्री आणि पुरुषांना परस्परांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख यानिमित्ताने नकळत होत जाते. त्याचप्रमाणे अडीअडचणींना, सल्लामसलत आणि सपोर्ट हवा असतो, तो मित्र-मैत्रिणींमध्ये जास्त चांगला वेगळ्या दृष्टिकोनातून मिळू शकतो. एकूण सर्वांगीण वाढीसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि आता मोकळ्या वातावरणात मुले-मुली ती निकोप मैत्रीण एन्जॉय पण करतात.

अडचणी येतात त्या फक्त वयामुळे ! हे वयच असं असतं ! पौगंडावस्थेतील वयाच्या या टप्प्यावर अनेक शारीरिक व मानसिक बदलांमुळे मुले भांबावलेली असतात . भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल कमालीचे आकर्षण वाटते. एक गोड हुरहुर वाटते. आपण कुणाला तरी आवडतो (म्हणजे त्यांच्या भाषेत लाईक करतो) ही भावना आवडणारी असते. आणि पाहिल्याबरोबर प्रेमात पडणे वगैरे होते. सुरुवातीला दोघे एका ग्रुपमध्ये असतात, नोट्सची देवाण-घेवाण होते. ओळख वाढते .मध्येच एखादे वाक्य कौतुकाचे उमटते आणि “पहिला पहिला प्यार है” वगैरे सुरू होते.

यात दिसणं, चालणं, हसणं, ड्रेस , हेअर कट हेच फक्त आवडतं आणि तेवढंच दिसतं. फक्त गुण. बाह्य सौंदर्य! आता तर संवादाची, संपर्काची अनेक साधने उपलब्ध आहेत.

त्यातून अधिक संवेदनशील मुलगा किंवा मुलगी असेल किंवा पालकांकडून पुरेसं प्रेम ,आधार ,सपोर्ट नसेल तर अशी मुले-मुली बाहेर वळतात आणि प्रेमात पडण्याची शक्यता वाढते. कोण कधी गैरफायदा घेतो याचीही त्यांना शुद्ध राहात नाही. हे जे प्रेम ते केवळ असतं आकर्षण ! क्षणिक !

आयुष्याचा जोडीदार निवडण्याइतकी ‘खोली’ या प्रेमाला नसते. केवळ टाईमपास म्हणूनही बरेचदा याकडे बघितले जाते.

म्हणूनच मुला-मुलींनी प्रेम, आकर्षण आणि मैत्री यातील फरक समजून घ्यायला हवा. डोळस आईवडिलांनी त्यांना ती समज आहे की नाही हे पारखत राहणं योग्य. यासाठी संवाद गरजेचा. तो जितका मनमोकळा असेल, सहज असेल , तितकी हेरगिरीचे प्रश्न विचारायची वेळ येत नाही.

प्रेम हे यापेक्षा खूप वेगळं आहे. वडिलांचं काळजीरूपी प्रेम, आईचं ममत्व, आजीची सायरूपी जपणूक याही प्रेमाच्या काही छटा.

असं प्रेम संयमी असतं. व्यक्त करण्याची पद्धतही हळवी, संवेदनशील असते. अट्टहास नसतो, त्यात ती किंवा तो कसे वागतात याला महत्त्व असतं. प्रेम असणाऱ्या व्यक्तीचे दोष आपल्याला इतरांपेक्षा जास्त माहिती असतात . तरीही ते केलं  जातं.

मैत्री हे त्यापलीकडील सुंदर नातं आहे. वय, पैसा, लिंग, जात, धर्म, प्रांत, वर्ण, देश यांच्या पलीकडले! एकमेकांना सांभाळून घेणारे, योग्य सल्ला देणारे, जीवाला जीव देणारे!

परंतु आज ज्याला प्रेम म्हटलं जातं, त्याला जर नकार दिला तर ज्या प्रकारे ऍसिड हल्ला, बलात्काराने ते व्यक्त होतं तर ते प्रेम असेलच कसं ? तो असतो फक्त मालकी हक्क ! सुडाची भावना येते म्हणजेच प्रेम असूच शकत नाही. ती एक उथळ भावना आहे, अस्थिर आहे, एकतर्फी आहे आणि एकतर्फी प्रेम फुललेलं नसतं, मग त्याचा भंग होईलच कसा ?

चाचपून बघायला हवं न ते ? बरेचदा अजमवण्यापूर्वीच पुढच्या पायऱ्या गाठल्या जातात. हे खूप धोकादायक आहे.

फसवणूक करणारे ते केवळ आकर्षण ! बाह्य सौंदर्याने तेवढे दिपून जाते ते आकर्षण ! परस्परांची पुरेपूर ओळख झालेली नाही तोपर्यंतचही ते आकर्षणचं ! प्रेमाला बहरण्यालाही वेळ द्यावा लागतो.

म्हणूनच या गोष्टींना आयुष्यात जितकं महत्त्व आहे. त्यापेक्षा करिअर हा जास्त महत्त्वपूर्ण विषय मुलामुलींसाठी आहे. ह्याचा विसर कधी पडू द्यायला नको, “प्यार किया नही जाता हो जाता है!” वगैरे केवळ समजुती आहेत. ती केवळ मूव्हीसाठी लिहिलेली गाणी आहेत. समोरच्याला पूर्ण ओळखल्याशिवाय त्याचं ‘प्रेम’ हे नामकरण करणं अयोग्यच! त्यामुळे मग ब्रेकअपचा प्रश्नच उरणार नाही.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER