शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये तुफान हाणामारी, मनसे नेत्याला दुखापत

Shiv Sainiks and Mansainiks - Maharashtra Today

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाल्यापासून मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सतत शाब्दिक चकमकी घडताना दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अनेकवेळा ट्विटरवर शिवसेनेला लक्ष्य केले आहे. मुंबई महापालिकेत मोठ्याप्रमाणात घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप मनसेच्या नेत्यांनी अनेकदा केला. त्यामुळे मनसे-शिवसेनेत नेहमी खडाजंगी होत असते. मात्र, यांच्यातील वाद आता थेट हाणामारीवर उतरल्याचं समोर आलं आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात हाणामारी करत असल्याचं बघायला मिळाले. जोगेश्वरी पूर्वेत ही हाणामारीची घटना घडली आहे.

जोगेश्वरी पूर्वेला प्रभाग 73 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे यांच्या घराजवळ मजास नाल्याचे साफसफाईचे काम सुरू होते. त्यादरम्यान मनसेचे उपाध्यक्ष प्रविण मर्गज यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्याठिकाणी असलेल्या कंत्राटदाराला मनसेच्या या कार्यकर्त्यांनी विचारणा केली. त्यादरम्यान त्याठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे हे सुद्धा त्यांच्या साथीदारांसोबत दाखल झाले. त्यावेळी दोन्ही पक्षामध्ये बाचाबाची सुरू झाली, त्याचे रूपांतर मारामारीमध्ये झाले.

या हाणामारीत मनसेचे प्रविण मर्गज यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिपळे यांनी दिली. या घटनेनंतर मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळावर तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे. पोलीस मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सध्या आपल्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button