नूतन , नर्गिस आणि आशा पारेख यांचे किस्से

Asha Parekh - Nargis - Nutan

लहान असल्याने स्वतःचाच चित्रपट प्रीमियरला पाहू शकली नव्हती नूतन

बॉलिवू़डमध्ये अनेक कलाकारांनी लहानपणीच चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. वयाने लहान असले तरी या कलाकारांनी चित्रपटात मुख्य कलाकारांच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र अनेकदा या कलाकारांनी रहस्यमय पण प्रौढांसाठी असलेल्या चित्रपटांमध्येही काम केले आणि जेव्हा हे कलाकार चित्रपट पाहाण्यासाठी चित्रपटगृहात गेले तेव्हा त्यांना चित्रपटगृहात प्रवेश नाकारण्यात आला होता. आताच्या काळात हे शक्य वाटत नसले तरी पूर्वीच्या काळाच असे सर्रास व्हायचे. याचे उदाहरण म्हणजे नूतन.

1951 मध्ये रविंद्र दवे दिग्दर्शित नगिना चित्रपट प्रदर्शित झाला होता. ही एक रहस्यमय मर्डर मिस्ट्री होती. चित्रपटात अनेक घाबरवणारी दृश्येही होती. या चित्रपटात नसीर खान नायक होता तर नायिका होती नूतन. नूतनने जेव्हा हा चित्रपट केला तेव्हा ती फक्त 15 वर्षांची होती. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर एका भव्य प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते. नूतन शम्मी कपूरसोबत प्रीमियरसाठी चित्रपटगृहावर पोहोचली. आपल्याला आतमध्ये जाण्यापासून कोणी अडवेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु मुख्य दरवाज्यातच नूतनला वॉटमनने अडवले आणि लहान असल्याने आतमध्ये सोडता येणार नाही असे सांगितले. शम्मी कपूरने मध्यस्थी केली. नूतन चित्रपटाची नायिका आहे हे समजावून सांगितले, पण वॉचमन आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याने नूतनला प्रवेशच दिला नाही. त्यामुळे नूतनला परत जावे लागले होते. आज अशा घटनांची आपण कल्पनाही करू शकत नाही.

नायकाच्या अगोदर नामावलीत नाव येत असे नर्गिसचे

चित्रपटांच्या नामावलीत सर्वप्रथम नायकाचे नाव येते आणि त्यानंतर नायिका आणि अन्य कलाकारांचे. पण बॉलिवूडमध्ये अशाही काही नायिका आहेत ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या बळावर नायकापेक्षा जास्त लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या नावावर प्रेक्षक चित्रपट पाहाण्यास येत असत. या नायिंकामध्ये नूतन आणि नर्गिसचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.

प्रख्यात अभिनेत्री नर्गिसने अगदी लहानपणापासून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. आपल्या अभिनयाने नर्गिसने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. नर्गिस चित्रपटात असेल तर तो चित्रपट नक्की यशस्वी होईल याची खात्री निर्मात्यांना असे. नरगिसची ही लोकप्रियता पाहूनच निर्मात्यांनी चित्रपटात नर्गिसचे नाव सगळ्यात अगोदर देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर नायक आणि अन्य कलाकारांची नावे देण्यात येत असत. मदर इंडिया चित्रपटात तर चित्रपटाच्या शीर्षकापूर्वी नर्गिसचे नाव दाखवण्यात आले आणि त्यानंतर मदर इंडिया नाव दाखवण्यात आले होते. एका निर्मात्याने तर आपल्या एका चित्रपटाचे नावच नर्गिस ठेवले होते.

परंतु फार कमी जणांना ठाऊक आहे की नर्गिसने लहानपणी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण चित्रपटात काम करू लागल्याने तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न सोडून दिले होते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे अत्यंत उच्च शिक्षित म्हणजे डॉक्टर, इंजीनियर वगैरे आहेत. पण त्यांनी आपला पेशा सोडून अभिनयात संघर्ष केला आणि तेथे यश मिळवले. तर काही कलाकारांना डॉक्टर, इंजीनियर व्हायचे होते पण घरच्या जबाबदारीमुळे त्याकडे पाठ फिरवून तोंडाला रंग लावून कॅमेऱ्यासमोर उभे राहावे लागले होते. अशा अनेक कलाकारांपैकीच एक कलाकार होती नर्गिस.

नासिर हुसेनशी लग्न न झाल्याने आशा पारेख जन्मभर अविवाहित राहिली

आशा पारेखने आपल्या दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ केले होते. तिच्याशी लग्न करण्यास काही नायक आणि अनेक तिचे प्रशंसक एका पायावर तयार होते. पण आशा पारेखने आजन्म अविवाहित राहाण्याचा निर्णय घेतल्याने तिने कोणालाही जवळ येऊ दिले नाही. अविवाहित राहाण्याचे कारण आशा पारेखने तिच्या आत्मचरित्रात सांगितले आहे.

आशा पारेख ने लेखक दिग्दर्शक नासिर हुसेनसोबत सात चित्रपट केले. यात तीसरी मंजिल कारवां या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. त्यावेळेसच आशा पारेख आणि नासिर हुसेनमध्ये अफेयर असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु होत्या. आशा पारेखने म्हटले आहे, जीवनात मी कोणावर जर प्रेम केेले असेल तर ते नासिर हुसेन यांच्यावर केले होते. परंतु त्यांचे लग्न झालेले असल्याने आणि मला कोणाचे घर तोडायचे नसल्याने आमचे प्रेम पुढे सरकू शकले नाही. पण त्यांच्या कुटुंबियांशी माझे आजही चांगले संबंध आहेत. त्यामुळेच ज्या व्यक्तीवर मी प्रेम करू शकणार नाही त्याच्याशी लग्न करून राहाण्यापेक्षा मी अविवाहित राहाण्याचा निर्णय घेतला असा उल्लेख आशा पारेखच्या द हिट गर्ल या आत्मचरित्रात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER