किस्से हायकोर्टातील-४: साडी, रेड सिग्नल व गणपती !

Bombay HC

Ajit Gogateमुळचे आंध्र प्रदेशमधील असलेले न्या. कोंडा माधव रेड्डी मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court)  मुख्य न्यायाधीश (Chief Justice) झाले तेव्हाचे काही मजेशीर किस्से आज मी सांगणार आहे. बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायाधीश नेमण्याची प्रथा मुंबई हायकोर्टाच्या बाबतीत न्या. रेड्डी यांच्यापासून सुरु झाली. न्या. रेड्डी एप्रिल १९८४ ते ऑक्टोबर १९८५ असे जेमतेम दीड वर्ष मुख्य न्यायाधीश होते. या काळात त्यांनी थोड्या दिवसांसाठी महाराष्ट्राचे कार्यवाहक राज्यपाल म्हणूनही काम केले.

साडी नेसून या!

राजभवनावर शपथविधी झाल्यावर न्या. रेड्डी हायकोर्टात आले. प्रथेप्रमाणे नव्या ‘चीफ’ला ‘विश’ करण्यासाठी हायकोर्टातील अधिकारी वर्गाची,  हातात  पुष्पगुच्छ घेऊन, न्या.रेड्डी यांच्या चेंबरबाहेर रीघ लागली. त्या वेळी हायकोर्टाच्या ‘ओरिजिनल साईड’च्या रजिस्ट्रारना ‘प्रोथोनोटरी अ‍ॅण्ड सीनियर मास्टर’ असे  म्हटले जायचे. तेव्हा भरुचा नावाच्या एक पारशी मॅडम त्या पदावर होत्या. अन्य पारशांप्रमाणे भरुचा मॅडमही इंग्रजाळलेल्या होत्या. त्या ऑफिसला येतानाही मिडी किंवा लांब स्कर्ट घालून यायच्या.

भरुचा तशा वेशात न्या.रेड्डी यांना ‘विश’ करायला गेल्या. ‘चीफ’ साहेबांनी त्यांना एकदा नखशिखांत न्याहाळले  व ‘उद्यापासून साडी नेसून कोर्टात या’ असे फर्मान सोडून सर्वांसमक्ष भरुचा यांचा पाणउतारा केला. त्या. हिरमुसल्या चेहर्‍याने चेंबरमधून बाहेर पडल्या. दुसर्‍या दिवसापासून भरुचा मॅडम साडी नेसून कोर्टात येऊ लागल्या. आधीच स्थूल देहयष्टी.आयुष्यात कधी साडी नेसायची आणि सांभाळण्याची सवय नाही. त्यातून साडी झुळझुळीत जॉर्जेटची.
बिच्चार्‍या भरुचांची साडीचा तो बोंगा सांभाळत धावपळ करताना फारच कुचंबणा व्हायची. या साडीपेक्षा आधीची मिडी किंवा स्कर्ट बरा, असे त्यांच्याकडे पाहून वाटायचे. भरुचा मॅडमचे ते ‘ध्यान’ हा हायकोर्टात कुचेष्टेचा विषय झाला होता. पण काय करणार? न्या. रेड्डी निवृत्त होऊन जाईपर्यंत भरुचा हे सर्व सहन करत राहिल्या.

‘सिग्नलपे गाडी रुकेगी नही’

पहिल्याच दिवशी संध्याकाळी कोर्टाचे काम संपल्यावर न्या. रेड्डी घरी जायला निघाले. घर म्हणजे मलबार हिलवरील ‘चीफ जस्टिसेस बंगलो’ हे सरकारी निवासस्थान.
हायकोर्टाच्या ओव्हल मैदानाकडील गेटमधून ‘चीफ’ साहेबांची लाल दिव्याची मोटार बाहेर पडली. तेव्हा लालदिव्याच्या सरसकट सर्वच मोटारी जाताना रस्त्यावरील ट्रॅफिक सिग्नल बंद करण्याची पद्धत नव्हती. न्या. रेड्डी यांची मोटार निघल्यापासून पहिल्या पाचच मिनिटांत पारसी बाबडी (सीटीओ), खडा पारसी (चर्चगेट) व टॉक ऑफ  दि टाऊन (मरीन ड्राईव्ह) येथे लागोपाठ तीन सिग्नलला थांबली. तिसर्‍या वेळेला मोटार थांबल्यावर न्या. रेड्डी यांनी ड्रायव्हरला ‘गाडी बारबार क्यूँ रोक रहे हो’, असे विचारले. ड्रायव्हरने लाल ट्रॅफिक सिग्नलकडे बोट दाखवत खुणेनेच उत्तर दिले. ’ईगो’ दुखावलेल्या न्या. रेड्डी यांनी ड्रायव्हरलाच प्रतिप्रश्न करत लगेच हुकूम केला, ‘गव्हर्नरकी गाडी सिग्नलपें रुकती है क्या? हम भी गव्हर्नरके बराबर है!  हमारी गाडीभी सिग्नलपे नही रुकेगी !!’
बिच्चारा ड्रायव्हर नंतर रोज येता-जाता, जीव मुठीत धरून, सर्व सिग्नल तोडत साहेबांची गाडी चालवत राहिला. त्यानंतर अनेक दिवस जजेसच्या ड्रायव्हर मंडळींत दुपारच्या गप्पाष्टकांत या किश्श्याची कितीतरी आवर्तने केली गेली. खरं तर, हैदराबादमध्ये जन्मलेल्या व शालेय शिक्षणही तेथेच झालेल्या न्या. रेड्डी यांनी फर्गसन व लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना सहा वर्षे पुण्यात काढली होती. बहुधा ट्रॅफिक सिग्नल न पाळण्याची शिस्त त्यांना तेथेच लागली असावी !

अनेक जजेसचा गणपती झाला !

बाहेरच्या राज्यातील चीफ जस्टिसची एक अडचण म्हणजे त्याला स्थानिक परिस्थितीची अजिबात कल्पना नसते. पण अधिकार्‍यांनी सांगूनही आपलाच हेका चालविणारा ‘चीफ’ असला की त्याच्यासकट अनेक जजेसचा कसा ‘गणपती’ होतो, ते आता पाहा. न्या. रेड्डी एप्रिलमध्ये रुजू झाले. तोपर्यंत त्या वर्षाचे हायकोर्ट कॅलेंडर तयार होऊन छापले गेले होते. ते पाहिल्यावर न्या. रेड्डी यांना ऑगस्ट महिन्यात शनिवार, रविवार व १५ ऑगस्ट खेरीज आणखी दोन लाल रंगातील तारखा दिसल्या, त्या गणेश चतुर्थी व अनंत चतुर्दशी अशा गणपतीच्या दोन सुट्ट्या होत्या. मुंबईत सार्वजनिक गणपतींच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांनी  रस्ते कसे पूर्ण ब्लॉक होतात, हे लक्षात घेऊन हायकोर्टात पूर्वापार या दोन सुट्ट्या  दिल्या जायच्या. त्यातील एक सुट्टी नंतर एखाद्या शनिवारी काम करून भरून काढली जायची.

न्या. रेड्डी यांनी यापैकी अनंत चतुर्दशीची सुट्टी आयत्या वेळी रद्द केली. त्यावेळी न्यायाधीशांची संख्या कमी होती व बहुतेक सर्व मलबार हिलवरच राहायचे. येता-जाता चौपाटीवरून जावे लागायचे. गणपतीच्या आगमनाच्या मिरवणुका शहराच्या निरनिराळ्या भागांत, निरनिराळ्या वेळी निघतात म्हणून गर्दी मॅनेजेबल असते. पण विसर्जनाच्या वेळी हजारो गणपतींचे चौपाटी हे विसर्जनाचे एकच ठिकाण. त्यामुळे तेथे अपार जनसागर लोटतो. विसर्जनाची असलेली सुट्टी रद्द केल्याने त्या दिवशी संध्याकाळी घरी जाताना स्वत: न्या. रेड्डी यांच्यासह अनेक न्यायाधीश चौपाटीवरील विसर्जन मिरवणुकांमध्ये कित्येक तास अडकले. शेवटी गाड्या उलट्या फिरवून मेट्रो, क्रॉफर्ड मार्केट, भायखळा, सातरस्ता, महालक्ष्मी, हाजी अली असा दुप्पट वळसा घालून त्यांच्या ‘मिरवणुका’ एकदाच्या घरी पोहोचल्या. त्यानंतरच्या वर्षीही न्या. रेड्डी चीफ जस्टिस होते. पण आता मात्र आधी रद्द केलेली अनंत चदुर्दशीची सुट्टी त्यांनी कॅलेंडरमध्ये स्वत:हून समाविष्ट केली. अनुभवासारखा दुसरा गुरू नाही, असे म्हणतात ते उगीच नाही!

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER