कथा आणि व्यथा ज्ञानदात्यांची

कथा आणि व्यथा ज्ञानदात्यांची

महाविद्यालयातून बाहेर पडणारा तरुण तरुणींचा घोळका.नुकत्याच सेट व पेट परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या ! डोळ्यात उद्याच्या प्राध्यापक झाल्यानंतरची स्वप्न. त्यातील बहुतांशी विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती बेताची होती. बरेच जण पोटाला चिमटा घेऊन शिकलेले. पुढे घरादाराला सुखात ठेवण्याचे ध्येय त्यांच्या समोर असणारच. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना आपण प्राध्यापक होणार हे फार रोमँटिकही वाटत असणार .

पण मी बोलते आहे ते ‘ CHB म्हणजे क्लॉक हवर्स बेसिस म्हणजे घड्याळी तासिका तत्वावर नेमलेले प्राध्यापक आणि त्यांच्या प्रश्नाबाबत ! राज्यातील विविध महाविद्यालयातील किमान वीस हजार प्राध्यापक हे सी एच बी तत्त्वावर चे असून प्रत्येक महाविद्यालयातील त्यांची संख्या 20 ते 30 टक्के एवढी आहे. तासिका तत्वावर त्यांना केवळ २५० ते ३०० रू पर्यंत मानधन असून आठवड्यातून केवळ आठ तास मिळतात. ही त्यांची पिळवणूक गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. मुख्य म्हणजे या कंत्राटी प्राध्यापकांमध्ये साहित्य अकादमी ,राज्य पुरस्कार प्राप्त नामवंत साहित्यिकांनपासून ते अगदी आदिवासी समाजातील उच्चशिक्षित यांचा पण समावेश आहे. कित्येक पीएचडी धारक आहेत .आणि म्हणूनच आता राज्यातील सगळे कंत्राटी प्राध्यापक आंदोलनाच्या भूमिकेत शिरले आहेत. मुख्य म्हणजे या प्राध्यापकांची कोणतीही संघटना नाही.

नुकतेच श्रीयुत विनोद तावडे यांनी नवीन शिक्षक भरतीची बंदी उठवली जाईल असंही म्हटलं आहे. राज्यसरकारने प्रतितास पाचशे रुपये दिले जाणार असे सांगितले आहे. प्रक्रिया सुरू झाली आहे असे म्हणतात !पण मुळातच शिक्षणासारख्या विद्यादानाच्या, व विद्या ग्रहण केल्या जाणाऱ्या क्षेत्रातला हा अन्याय नक्कीच क्लेशकारक आहे.

पुढे सुधारणा होतील तेव्हा होतील , होत आहेत. पण मुख्य मुद्दा आहे तो शिक्षण क्षेत्रातल्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाचा.जर अशा प्राध्यापकांना इतका कमी वेतन तासाला मिळणार असेल तर त्यांना पर्याय वेगवेगळ्या विद्यालयात काम करणे आहे. म्हणजे विविध विद्यालयांच्या व्यवस्थापनाची जुळवून घेणे, होणारी पळापळ, विविध ठिकाणच्या नोट्स वेगवेगळ्या काढणे हे ओघानेच आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकवायचे म्हणजे पोरखेळ नाही. तरीही मेहनत करून वेतनातून घर दार चालवणे मुश्कील होत असेल, तर तोही शेवटी माणूस आहे. पोटासाठीच काम करतो. अशावेळी तो विद्यार्थ्यांना किती मनापासून ज्ञानदान करू शकेल ? चिंता विरहीत राहत असेल ? शिकवण्यातला इंटरेस्ट राहात असेल का ? ज्ञानदान हे अतिशय पवित्र कार्य आहे. अनेक आदर्श शिक्षकांच्या रूपातच विद्यार्थ्यांसमोर असतात. असे स्वतः निराश असलेल्या शिक्षकांच्या मोटिवेशन ने विद्यार्थी काय प्रेरित होणार ?पुन्हा एवढ् शिकून पुढे काय मिळतं हे कटू सत्य जर मुलांसमोर आलं तर ते अभ्यास तरी कशाला करतील ? आज अभ्यासाचा दर्जा खालावलेला आहे. शिकणाऱ्या आणि शिकवणारयांनाही ज्ञान किती असेल याची शंकाच आहे ! असे ताशेरे मात्र ओढले जातात.

खेड्यापाड्यातून येणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक शेतात मजुरी करणारे, भावंड शिकू न शकलेली, एखाद्याला शिक्षणाची आवड असेल तर शहरात राहून कधीकधी पार्टटाइम काम करून मिस्त्री काम भाजीविक्री, प्रसंगी रिकाम्या पोटी राहून सगळ्या डिग्र्या ची माळ गळ्यात बांधून भटकावे लागते आणि जेव्हा डोनेशन भरभक्कम मागितले जाते, तेव्हा डोळ्यातल्या सगळ्या आशा मावळल्या तर नवल ते काय ?

महाविद्यालयीन शिक्षण तरी भविष्य घडविण्यासाठीच घेतले जाते. आता जरी गरिबी सारखे प्रश्न घेऊन विद्यार्थी उभे असलेले तरी त्यांना या काळोख्या रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल दिसायला तर हवा !

पूर्वी खरच अशा लांबलचक डिग्रीांच्या ढीगांचा फार अभिमान असायचा. आता याबाबतचे अनुभव फार विचित्र आहेत. असे अनेक प्राध्यापक आहेत की त्यांना हे लेबल म्हणजे फक्त आशा दाखवणारा व पुढे पुढे तरंगत जाणारा फुगा वाटतो. कारण हाती लागेल की नाही याची निश्चितच नाही. जणू मृगजळच ते ! जसे जसे पुढे जाल तसतशी एकेका डिग्री ची गरज लागत जाते आणि प्रत्यक्ष एखादे पद मिळवायचे म्हंटले तर हाती निव्वळ शून्य येते. क्षितिज कधी हाती गवसतच नाही !

खूप शिकून तासिका बेसिस वर लागलेले प्राध्यापक, पुढे पीएचडी पण मिळवलेली, वयाप्रमाणे लग्न मुलं संसार सगळ पाठीशी असणारे. शहरात केवळ खोली भाडेही जेमतेम भरले जाते. उरलेल्यामध्ये भागणार कसं ? परत गावाकडे जावं लागतं. ज्या आई-वडिलांनी कष्ट करून शिकवलं, उद्याच्या आशा बघितल्या, त्यांना आपल्या सगळ्या संसारासकट रिकामे हात हलवत सामोरी जाणं किती कठीण असणार आहे ! आणि सी एच बी च्या पोस्टवर तर अक्षरशः सेल लागावा अशी गर्दी असते.

मुख्य असे अनुभव भोगलेले, समोरच्या करिअरच्या वाटेवर जाणाऱ्यांना मात्र सेट-नेट ,पेट कसे महत्त्वाचे हेच सांगतात .नाहीतर “तुम्ही बाबांनो माझे सांगाती होणार!” असेही नाही सांगू शकत. बरे चा आपण घेतलेल्या ज्ञानाचा समोरच्याला उपयोग हवा ही मानसिकता अजूनही गुरु मार्गदर्शक म्हणून त्यांच्या जवळ नक्की असते. बरेचसे लोक मुळातून शिकवायला आवडतं म्हणून देखील या मार्गाला आलेले असतात. समाजात मान सन्मानाचे स्थान असतंच. आणि वस्तुस्थितीची जाणीव होऊन ऍडमिशन झाल्या नाहीत तर त्यांच्याच नोकरीवर गदा येणार असते. मग आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा कोण पाडून घेणार ?

मुली स्त्रियांसाठी हे बर आहे, पण मुलांना घर सांभाळायचं असतं! असही ऐकू येतच. पण या गोष्टी खरच मन अचंबित करतात . मुले स्त्रिया तेवढ्याच प्रामाणिकपणे अभ्यास करतात भरपूर कष्ट ही करतात तेवढ्याच बुद्धिमान असतात आणि त्याच प्रोसेस मधून डिग्री मिळतात. म्हणजे ज्ञानदान ही तेवढ्याच तन्मयतेने करतात. मग मुली स्त्रियांना हे आहे बरंय ! असं का? कित्येक स्त्रियांवर आज कुटुंबाची पूर्ण जबाबदारी आहेच.

आज खरंतर कुठल्याही डिग्रीला फार अर्थ उरलेला नाही. शिक्षणाच्या वाघिणीच्या दुधात भेसळ असल्याने त्यातून वाघ नव्हे शेळ्या जन्माला येताना दिसतात. पण डिग्रीला पर्यायही नाही. तुम्हाला काय येतं आणि किती येत ? ज्ञान आणि स्किल किती ? यापेक्षा कोणती डिग्री आहे हे महत्त्वाचं हेच विचारात घेतले जाते. यावर मार्ग लवकर निघेल अशी आशा आपण फक्त करू शकतो. आणि डिग्री बरोबरच वेगवेगळे स्किल्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती विद्यार्थ्यांनी जास्त मिळवत राहावे, भरपूर वाचत ,बघत , ऐकत राहावं ! असं वाटतं. तेव्हाच आपण उद्याच्या उष:कालाची वाट पाहू शकू !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER