ट्रक वाहतूक बंद करा, कोरोना नियंत्रणात येईल ! – ममता बॅनर्जी

Mamata Banerjee

कोलकाता :- वाहने लांब लांब जातात. त्यांच्या टायरमुळे कोरोनाची साथ पसरते. ट्रकची वाहतूक बंद केली तर कोरोनाची साथ नियंत्रणात येईल, असा सल्ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिला!

झारग्राम जिल्ह्याच्या प्रशासकीय बैठकीत त्यांनी उल्लेखित सल्ला दिला. त्या म्हणाल्या – ट्रकचे टायर सगळीकडे प्रवास करतात.  त्यामुळे त्या टायरने कोविड-१९ विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे ट्रक वाहतूक बंद केली तर कोरोनावर नियंत्रण आणता येईल.

याबाबतचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या – माझ्या घराजवळ एकाच घरातल्या सहा  जणांना कोरोना (Corona) झाला. ती साथ ३६ जणांपर्यंत पोहचली. गाड्यांच्या टायरवरून विषाणूंचा प्रसार होऊ शकतो. मी त्या घराजवळ जाणारी वाहतूक थांबवली. कोरोनाची साथ कमी झाली. ८ सप्टेंबरला वाहतूक पुन्हा सुरू झाल्यावर परत कोरोना रुग्णांच्या रुग्णांची संख्या वाढली. बहुधा शेजारच्या झारखंडमधून येणाऱ्या ट्रकच्या टायरवरून कोरोनाचे विषाणू आपल्या राज्यात येत असतील. त्यामुळे टोल प्लाझावर ट्रकच्या टायरचीही तपासणी करा. झारग्राम पश्चिम बंगालमधला भाग झारखंडच्या सीमेला लागून आहे. झारखंडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कोरोनाचे विषाणू हवेमुळे पसरतात तसे वाहनांच्या टायर्समुळेही पसरू शकतात. त्यांच्या या दाव्यात अजिबात तथ्य नाही, असे नाही.

विज्ञान सांगते …

अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन’ने (CDC) कोरोना विषाणू हवेतून पसरू शकतात असे निरीक्षण जाहीर केल्यानंतर ममता बॅनर्जींनी हे वक्तव्य केले आहे. ट्रकचे टायर सिंथेटिक रबरापासून तयार करतात. ते टणक असते.  अशा टँक पृष्ठभागावर कोविड विषाणू पटकन ‘रेप्लिकेट’ करू शकत नाही. संशोधकांच्या मतानुसार टणक पृष्ठभागावर कोविड विषाणू जिवंत राहत असला तरीही जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. WHO च्या म्हणण्यानुसार कोविडचा विषाणू प्लॅस्टिक, स्टेनलेस स्टीलच्या पृष्ठभागावर तीन  दिवस तर तांब्यावर चार  तास आणि कार्डबोर्डवर एक  दिवस जिवंत राहू शकतो. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’ आणि ‘द लँसेट’ यांनी केलेल्या अभ्यासानुसार कोविडचा विषाणू प्लॅस्टिक, स्टेनलेस स्टीलच्या पृष्ठभागावर तीन  ते सात  दिवस तर कार्डबोर्डवर एक दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून ममतादीदींचा तर्क पूर्ण चूक आहे. वाहनांतून माणसांचे येणे – जाणे होत असल्याने त्यांच्या परस्पर संपर्कातून कोरोनाचा विषाणू पसरू शकतो हे सत्य जगाला माहीत आहे. त्यासाठी वाहतूक थांबवणे योग्य नाही. टायरचे तर्कट निराधार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER