‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार आणि गरिबांचे मृत्यू थांबवा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

devendra fadnavis & uddhav Thackeray

मुंबई : कोरोना साथीच्या राज्यात ‘रेमडेसिवीर’ची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) पत्र लिहून मागणी केली – रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा.

गरीब रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध निःशुल्क द्या. फडणवीस यांनी लिहिले आहे की – राज्यात दररोज सुमारे २० हजार रुग्णांची भर पडते आहे. सरासरी साडेचारशे रुग्णांचा मृत्यू होतो आहे. कोरोनाच्या उपचारासाठी रेमडेसिवीर हे महत्त्वाचे  औषध आहे. त्याचा पुरवठा सुरळीत राहील आणि हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ते मिळत नाही. त्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. राज्य सरकार याबाबत कितीही दावे करत असले तरी रुग्णालयांकडून मात्र याची टंचाई असल्याचे रुग्णांना सांगण्यात येते. केमिस्टकडून विकत आणा, असे सांगतात. याची किंमत सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी कोरोनाच्या रुग्णांचे मृत्यू होत आहेत.

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबवली होती; पण ती सदोष असल्याने अनेक जिल्ह्यांतून खरेदी केलेला औषधसाठा परत करावा लागला, असे वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. खरेदी योग्य झाली नसल्याने गुंता आणखी वाढला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अनेकांनी तर याचा ‘गोरखधंदा’ सुरू केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

गरीब रुग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरचा काळाबाजार ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीने उपलब्ध करून द्या. सर्व गरीब रुग्णांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयातसुद्धा रेमडेसिवीर निःशुल्क उपलब्ध करून द्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER