माझ्या मुलीची बदनामी थांबवा, अन्यथा आम्ही आत्महत्या करू; पूजाच्या कुटुंबीयांचा इशारा

Pooja Chavan

यवतमाळ : पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan) आत्महत्येनंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव घेतले जात आहे. या प्रकरणात पूजाच्या कुटुंबीयांनी प्रथमच माध्यमासमोर येऊन प्रतिक्रिया दिली. “माझ्या मुलीचा मृत्यू का झाला, हे पोलिसांच्या चौकशीतून समोर येईल. मात्र या सगळ्यात माझ्या मुलीची बदनामी होत आहे. माझ्या मुलीची बदनामी बंद करा, अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल. आमची मुलगी कशी होती हे आम्हाला माहिती आहे. आमची मुलगी धाडसी होती. ती आत्महत्या करू शकत नाही. तिच्या मृत्यूबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. अरुण राठोड या व्यक्तीला फक्त एकदा पूजासोबत पाहिले होते. अरुण राठोड कोण आहे, आम्हाला काही माहिती नाही.” असे पूजाच्या आई मंडू चव्हाण यांनी सांगितले.

“माझी बहीण वाघीण होती. ती आत्महत्या करूच शकत नाही. आत्महत्येनंतर मृत्यूपेक्षा तिची बदनामी केली जात आहे. माझी बहीण पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासोबतही फिरली आहे. त्यांच्यासोबतही तिने अनेक फोटो काढले आहेत, ते फोटो का व्हायरल करत नाही?” असा प्रश्न पूजाची बहीण दिया हिने विचारला. “माझी बहीण कार्यकर्ती होती, हे संपूर्ण बीडला माहिती आहे. तिचे वैयक्तिक फोटो व्हायरल करणे हे योग्य नाही.” असेही ती म्हणाली.

पूजाच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टी समोर आल्या. मात्र या गोष्टींचा पूजाच्या कुटुंबीयांना मोठा त्रास होत आहे. “‘राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करा, माझ्या मुलीची यात बदनामी करू नका. माझ्या मुलीची आणि आमच्या कुटुंबाची बदनामी थांबली नाही, तर मी कोर्टात धाव घेईल आणि कोर्टासमोर जाऊन कुटुंबासोबत आत्महत्या करेल.” अशी संतप्त प्रतिक्रिया पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER