स्क्रीन ॲडिक्शन घरातूनच थांबवा…

Shailendra Paranjapeदिवाळीच्या (Diwali) पूर्वसंध्येला पुण्यातल्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीनं फुलून गेल्या आहेत. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या महात्मा फुले मंडईचा परिसर, खरेदीसाठीचा सर्वात लोकप्रिय लक्ष्मी रस्ता, शनिपार या सर्व भागात रस्ते गर्दीनं ओसंडून वाहताहेत. या गर्दीत दुचाकीनं जाणंही अशक्यच आहे पण पायी फिरत फिरत गेल्यास लोकांमधला उत्साह स्पष्पणे जाणवतोय.

एक तर मार्च महिन्यापासून करोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन (Lockdown), वर्क फ्रॉम होम (Work From Home), ऑनलाइन शिक्षण (Online Education) या सर्व गोष्टींमुळे गेल्या सात महिन्यातले कोणतेच सण साजरे करता आले नव्हते. त्यामुळे दीपावलीच्या सणाच्या पूर्वसंध्येला करोनाची भीती कमी झाल्याचं सिद्ध होत आहे.

सरकार, त्यातले मंत्री आणि अगदी मुख्यमंत्रीही शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. पण काही तज्ज्ञ अशी लाट भारतात येणार नाही, अशी खात्री व्यक्त करताना दिसत आहेत. त्याचे कारण देताना ते भारतात हर्ड इम्युनिटी किंवा सामूहिक प्रतिकारशक्ती तयार झालीय, असा दावा करताहेत. त्याबरोबरच काही तज्ज्ञ भारतात यापूर्वी क्षयरोग, पटकी म्हणजे टीबी, कॉलरा यांसारख्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या असल्याने भारतीय लोकांना करोनाचाही फारसा त्रास होणार नाही, असं जानेवारीपासून सांगत होते. त्यांचे म्हणणे खरेही ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे करोनासंदर्भात घाबरू नका पण काळजी घ्या, इतकच आपण सारे लसविकसन होईपर्यंत करू शकतो. ते करायलाच हवे.

करोना काळात शालेय मुलांमधले स्क्रीन ॲडिक्शन
किंवा कोणत्याही प्रकारच्या स्क्रीनचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढल्याची बातमी एका वृत्तपत्रात प्रकाशित झालीय. वास्तविक, करोना आला असता नसता तरी अमेरिकेचे अंधानुकरण करताना स्क्रीन ॲडिक्शनचा धोका शालेय, किशोरवयीन, पौगंडावस्थेतल्या मुलांमधे वाढण्याचा धोका आम्ही यापूर्वीही या लेखमालेतून व्यक्त केला होता. पण आता करोना काळात हे प्रमाण १० ते २० टक्क्यांवरून ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

मुलांना मोबाइल वा टॅबविना चैन न पडणे, अशी गॅजेट बाजूला ठेवायला सांगितल्यावर त्यांची चिडचिड होणे किंवा त्यांना राग येणे, आक्रमकता वाढणे, एकटे रहायला आवडू लागणे, मोबाइल वा कोणत्याही स्क्रीनव्यतिरिक्त इतर कोणत्याही उपक्रमात मुलांना रस न वाटणं, ही या स्क्रीन ॲडिक्शनची लक्षणं आहेत.

तुमच्या घरातही केवळ मुलंच नाही तर अगदी मोट्यांपैकीही कोणामधे ही लक्षणे दिसत असतील, तर लाज न बाळगता समुपदेशकांचा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. करोनामुळं घराबाहेर करायच्या उपक्रमांना कात्री लागली हे खरं आहे पण म्हणून मोबाइलच्या किंवा लॅपटॉपच्या वा कोणत्याही स्क्रीनच्या आहारी किती जायचं, हे ज्याच्या त्याच्या हातातच आहे. मुळात तंत्रज्ञान कितीही पुढं गेलं किंवा फोन कितीही स्मार्ट झाले तरी ते बनवलेत ते माणसानं, हे विसरून चालणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे फोन्स किंवा गॅजेट्स ही साधनं आहेत, साध्य नव्हे, याचंही भान ठेवायला हवं.

पालकांनी घरातल्या कर्त्या मंडळींनी या भावी काळातल्या गंभीर समस्येवर वेळीच लक्ष द्यायला हवंय. त्यासाठी घरातला परस्परसंवाद वाढेल, हे बघायला हवं. त्याशिवाय करोनाचा लॉकडाऊन संपलेला असल्यानं एकत्र सामूहिक उपक्रमांची आखणी करायला हरकत नाही. दिवसातला किमान काही वेळ बिनमोबाईलचा, बिनस्क्रीनचा म्हणून राखून ठेवायला हवा.

स्क्रीन ॲडिक्शनचं रूपांतर गुन्हेगारी वाढण्यात होणार नाही, याची काळजी घराघरातूनच घेतली जायला हवी. कारण लोकांनी मास्क लावलाय की नाही, असली मुळातली त्यांची नसलेली कामंही पोलिसांना करावी लागत आहेत. त्यामुळे स्क्रीन ॲडिक्शन वेळीच रोखायला हवं आणि ते घरातूनच शक्य आहे. अन्यथा, घरातली समस्या सामाजिक पातळीवर उग्र रूप धारण करू शकते.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER