रुग्णांची लूट थांबवा : खा. संभाजीराजे

Sambhaji Raje

कोल्हापूर : आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या रुग्णांची काही खाजगी दवाखान्यांकडून पिळवणूक होत आहे. लाखो रुपयांचे बिल केले जात आहे. त्यावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांची विजिलन्स(दक्षता) टीम बनवून लोकांची होत असलेली पिळवणूक थांबवण्यासाठी नियोजन केले पाहिजे, अशी सूचना खा. संभाजीराजे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना आज केली. कोल्हापुरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक असल्याचे खा. संभाजीराजे छत्रपती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत सांगितले.

नवीन रुग्णांसाठी आरोग्य सुविधा वाढवून मिळाल्या पाहिजेत. ऑक्सिजन सुविधा, व्हेंटिलेटरची सोय वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याकरिता निधीतून २२ लाख रुपये त्याकरिता वापरण्यात यावेत अशी सूचना केली . (E.S.I.C) कामगार हॉस्पिटल  कोविड सेंटरला वर्ग करण्यात आलेले नाही. पुणे, मुंबई येथील E.S.I.C. हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर चालू असताना कोल्हापुरात काय अडचण आहे? लवकरात लवकर सेंटर चालू करा. रुग्णांकरिता कोणत्या हॉस्पिटलमध्ये, नेमके किती बेड शिल्लक आहेत याची माहिती उपलब्ध असली पाहिजे. त्याकरिता प्रत्येक हॉस्पिटलसमोर डिजिटल डिस्प्ले असला पाहिजे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने बेड उपलब्धतेची माहिती लोकप्रतिनिधींकडेसुद्धा दिली पाहिजे. जेणेकरून आम्हीसुद्धा रुग्णांना मदत करू शकू. अधिक सुविधेसाठी एक अप्लिकेशन  तयार करून त्याचा प्रभावी वापर केला पाहिजे. जम्बो कोविड सेंटर उभे  करण्यात वेळ खर्ची घालण्यापेक्षा उपलब्ध मोठ्या इमारतीमध्ये डागडुजी करून सुविधा उपलब्ध करा. लोकांकडून मदत निधी जमा करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी खाते उघडून ते सार्वजनिक केले पाहिजे. काही संस्थांकडून वस्तूच्या स्वरूपात मदत स्वीकारली पाहिजे, अशी सूचना खा. संभाजीराजे यांनी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER