आता तरी मुंबईकरांची चेष्टा करणे बंद करा, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

Pravin Darekar - CM Uddhav Thackeray

मुंबई : चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना मान्सूनने एन्ट्री पॉइंटलाच जोरदार दणका दिला. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाल्याचे बघायला मिळाले. मुंबई शहरातील अनेक सखल भागात पाणी तुंबले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी हिंदमाता आणि सायन सर्कल परिसरात गुडघाभर पाण्यातून पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला.

सायन सर्कल आणि हिंदमाता परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. या भागात गुडघाभर पाण्यातून प्रवीण दरेकर यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक आणि दुकानदारांशी चर्चा करत त्यांची चौकशी केली. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी तुंबले आहे. यात महापालिकेचा ढिसाळपणा उघड झाला. समुद्राला आलेली भरती आणि पावसाचा अनुभव मुंबईकर वर्षोनवर्षे घेत आहेत मात्र गेल्या वर्षभरापासून जे नियोजन करायला हवे होते ते केलेले नाही. त्यामुळे पुरता बट्ट्याबोळ झाला. आता तरी शहाणं व्हावं. सत्ताधाऱ्यांनी वरातीमागून घोडे नाचवणं बंद करावे. येणाऱ्या ८ ते १० दिवसांत संपूर्ण यंत्रणा कामी लावून पावसावर लक्ष केंद्रीत करावं अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केलीय.

दरम्यान, यावेळी दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील पावसाची माहिती जाणून घेण्यासाठी महापालिकेत गेले. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे ते फक्त ५ ते १० मिनिटे ते तिथे थांबले. एवढ्या वेळेत काय माहिती जाणून घेणार? काय उपाययोजना करणार? यंत्रणा कशी कार्यान्वित करणार? असा प्रश्नही दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. मुंबईकरांची चेष्टा करणे आता तरी थांबवा. अशा अडचणीच्या काळात मुंबईकरांच्या पाठिशी उभे राहिला नाहीत तर मुंबईकर तुम्हाला माफ करणार नाहीत. महापालिकेनं आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आम्ही दोष देत नाही पण आता जे काही दिवस तुमच्या हातात आहेत त्यात मुंबईकरांना दिलासा द्या, अशी मागणी दरेकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button