एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक, शोषण थांबवा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. दिवाळी तोंडावर असताना पगार थकल्याने दोन एस.टी कर्मचाऱ्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यात ‘माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार आहे’ असा आरोप करत कंडक्टरने आत्महत्या केली. याबाबत आज विरोधी पक्षनेते फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक, त्यांचे शोषण तातडीने थांबवा. मागील तीन महिन्यांचे वेतन नाही. कामगार कपातीमुळे भविष्याच्या निर्माण झालेल्या समस्या, त्यांच्या जीवनातील अनिश्चितता याकडे लक्ष देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज्य महामार्ग परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचाऱ्यांची सध्या परवड सुरू आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तीन ते चार महिन्यांपासून काही महिन्यांचे आंशिक वेतन मिळाले. जूनचे तर वेतनच अद्याप प्राप्त झालेले नाही.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे २५ टक्के, मे महिन्याचे ५० टक्के वेतन अजून मिळालेले नाही, तर जून महिन्याचे १०० टक्के वेतन अजून मिळालेले नाही. एसटीच्या लाखावर कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अस्थिर मानसिकतेत जीवन जगत आहेत. एकीकडे वेतन नाही व दुसरीकडे भविष्यात आपल्या नोकऱ्या तरी टिकणार का? ही चिंता त्यांना सतावत आहे. दुष्काळी भागातील ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना आपण २०१९ मध्ये एसटीच्या सेवेते सामावून घेतले, त्यातील हजार ५०० जणांना पुढील आदेशापर्यंत त्यांना सेवेवर येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याचाही घाट घातला जात आहे. असे करताना कुठल्याही संघटनांना विश्वासात घेतले गेले नाही, हे आणखी दुर्देवी आहे.

एसटीचे ३२८ कर्मचारी कोरोनाबाधित झाले. आठ जणांचा मृत्यू झाला. ते सुद्धा या काळात ‘कोरोना वॉरिअर्स’प्रमाणे सेवा देत असल्याने त्यांच्याही समस्यांकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारने कोरोना बळींना ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली. तथापी मृत्यू झालेल्या आठ जणांच्या कुटुंबीयांना अद्याप काहीही मदत मिळाली नाही. एसटी ही ग्रामीण परिवहनाचा आत्मा आहे. या समस्यांकडे आपण तातडीने लक्ष द्यावे, ही माझी विनंती आहे. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER