राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक; शशिकांत शिंदेंचा आरोप

सातारा :- राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली. सातारा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. शशिकांत शिंदे यांनी दगडफेकीचा निषेध केला आहे. “भाजपची काही मंडळी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. साताऱ्यात (Satara) काही व्यक्ती आल्या.

त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि राज्यमंत्र्यांच्या घराबाहेर दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्या व्यक्ती कोणत्या पक्षाच्या आहे याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. पोलिसांनी आरोपींना २४ तासांत  अटक करावी, अशी विनंती आहे. आम्हीदेखील जशास तसे उत्तर देऊ शकतो. खालच्या पातळीवर राजकारण करताहेत, हे दुर्दैव आहे.” असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी मराठा समाजाच्या पाठीशी

देशात कोरोनाची परिस्थिती बिकट असताना काही जण महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना तीव्र झाल्या. कोर्टाने घेतलेल्या निर्णयावर सर्व स्तरांवरून नाराजी व्यक्त होत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हात जोडून निर्णय घेण्याची विनंती केली आहे. मराठी बांधवांच्या पाठीशी  होतो, आहोत.  यापुढेही राहणार… मराठा समाज जो निर्णय घेईल त्यासोबत आम्ही राहू.

भाजपच्या मंडळींना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा वाटत असेल तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे ताकद लावा आणि कायदा करा, आम्ही स्वागत करू, असे शशिकांत शिंदे म्हणाले. “मराठा बांधवांच्या नावावर राजकारण करणे थांबवा. ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई होईल. आम्ही त्यांना उत्तर द्यायला समर्थ आहोत. मात्र, आज मराठा बांधवांच्या भावना तीव्र आहेत. या प्रकरणात कोण आहेत, पोलिसांनी त्यांची नावे  जाहीर करावीत, नक्की यामागे कोण आहेत हे समजेल.” असे शशिकांत शिंदे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button