पोट साफ होणे शरीरस्वास्थ्याकरीता आवश्यक !

आयुर्वेद तज्ज्ञाकडे गेलो की पोट साफ होते का हा प्रश्न हमखास विचारला जातो. डोक्याचा आजार असो वा पोटाचा अथवा संधिवात आमवात; पोट कसे साफ होते वर्ण काय असतो हे केसपेपरमधे नक्कीच नमूद करण्यात येते. आहार सेवनानंतर त्यावर पाचनक्रिया होऊन त्याचे आहाररस (शरीराला उपयोगी पोषक रस) व मल (waste) असे विभाजन होत जाते. शरीराला उपयोगी नसलेले किट्ट, मलस्वरूपात गुदमार्गाने बाहेर निघते. रोज मलविसर्जन होणे; कोणतेही औषध, पाणी, चहा पेपर तंबाखू सारख्या प्रेरकाची गरज न पडणे हे नैसर्गिक आहे.

आयुर्वेदात (Ayurveda) मूत्र स्वेद पुरीष हे तीन मुख्य मल (excretory) सांगितले आहेत. हे तिन्ही मल शरीरात जास्त काळ राहिले तर शरीरात विकृती निर्माण करतात. त्यामुळे हे रोजच्या रोज शरीराच्या बाहेर जाणे स्वास्थ्याकरीता आवश्यक असते. पोट साफ न झाल्यास भूक न लागणे, पोट फुगल्याप्रमाणे वाटणे, गुडगुड आवाज येणे, पोट जड वाटणे किंवा दुखणे अशी लक्षणे जाणवतात. अतिप्रमाणात झाले तरीही त्रासदायकच.

मल विकृती काय असू शकतात ते बघूया –

  • मलविसर्जन वेळी कुंथावे लागणे.
  • आव चिकट कफयुक्त शौचास होणे.
  • मळाचा रंग बदलणे.
  • पातळ शौचास होणे व वारंवार जावे लागणे.
  • एकाच वेळी पोट साफ न होणे.
  • रक्तयुक्त मलप्रवृत्ती होणे.
  • मल प्रवर्तनावेळी गुदभागी वेदना आग होणे.
  • ही लक्षणे असल्यास वेळीच तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

आहारात बदल योग्य चिकित्सा यामुळे फायदा होतो. पोट साफ होत नसेल तर त्याची कारणे शोधणे गरजेचे आहे. बरेचजण लगेच इसबगोल त्रिफळासारखी औषधे घेतात. एखादेवेळी घेणे वेगळे पण रोजच घ्यावे लागत असेल तर प्रथम आहार चुकीचा आहे का हे बघावे.

पोट साफ होण्याकरीता आहारात स्निग्ध पदार्थ असणे आवश्यक असते. बऱ्याचवेळा टिफीनमधे कोरडी भाजी पोळी ( तूप न लावता) खाल्ल्या जाते किंवा वजन वाढेल या चुकीच्या भितीने आहारातील स्निग्ध पदार्थ कमी केले जातात ज्यामुळे कोरडेपणा रुक्षता येऊन शौचास कुंथावे लागते. पोट साफ करण्याची औषधे घेण्यापेक्षा अशावेळी आहारात गाईच्या तूपाचा वापर अपेक्षित परीणाम दाखवून देतो. औषध घेण्याची कधी गरजच पडत नाही.

भूक नसतांना जेवणे. अजीर्ण, वारंवार खाणे, भूक असूनही कमी खाणे हे पाचनतंत्र बिघाड करतात व परीणाम स्वरूप मलबद्धता वा अतिसार उत्पन्न करतात. बऱ्याचवेळा लहान मुलांना रोज पोट साफ होत नाही. मॅगी, वेफर्स बिस्किटसारखे कोरडे पदार्थ, मैद्याचे पदार्थ पोट जड करतात. मुलांच्या आहारात या गोष्टी बंद केल्या तरीही फरक जाणवतो.

आयुर्वेदात सहा रसयुक्त आहार असावा असे सांगितले आहे. कडू तिखट व तुरट पदार्थ अधिक प्रमाणात घेणे हे बद्धकोष्ठता करणारे तसेच मळ रुक्ष करणारे आहे. खारट आंबट गोड पदार्थ मळ गुदाकडे नेण्यास मदत करतात. त्यामुळे या सर्व रसांचा समावेश आवश्यक ठरतो. जेणेकरून नैसर्गिकरित्या औषधे न घेता पोट साफ होऊ शकेल.

काळ्या मनुकाचा काढा किंवा भिजवून खाणे. एरंडतेल गरम पाण्यासह घेणे किंवा हिरड्यांचे चूर्ण गरम पाण्यासह घेणे पोट साफ करण्यास मदत करतात. अनेक चूर्ण वटी आयुर्वेदात सांगितल्या आहेत परंतु ते चिकित्सकाच्या सल्ल्यानेच घ्याव्या.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER