‘ओव्हर थ्रो’च्या चार धावा रद्द करा; खुद्द बेन स्टोक्सने केले होते पंचांना आवाहन

Stokes appealed to cancel overthrow runs

लंडन : विश्वचषक अंतिम सामन्यानंतर अतिशय वादाचा विषय ठरलेल्या ओव्हर थ्रोच्या चार धावा इंग्लंडच्या धावसंख्येतून वगळल्या जाव्यात, असे इंग्लंडच्या विजयाचा नायक बेन स्टोक्स याने पंचांना आवाहन केले होते, असे  इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने म्हटले आहे.

विश्वचषक अंतिम सामन्यात बेन स्टोक्सच्या बॅटला चेंडू लागून झालेल्या ओव्हर थ्रोच्या इंग्लंडला मिळालेल्या पाचऐवजी सहा धावा या एका चुकीने न्यूझीलंडला विश्वविजेतेपदापासून वंचित ठेवल्याचा आरोप होत आहे. त्यासंदर्भात बेन स्टोक्स याने आपल्याला आयुष्यभरासाठी या घटनेचा खेद राहील, असे म्हटले आहे. सामन्यादरम्यान हे ओव्हर थ्रो नाट्य घडले त्यावेळीसुद्धा बेन दोन्ही हात उंचावून या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करताना दिसला होता.

ही बातमी पण वाचा : जोफ्रा आर्चरने वर्ल्डकपबद्दल चार वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी !

धाव घेताना झेपावताना स्टोक्सच्या बॅटला लागून चेंडूची दिशा बदलून ओव्हर थ्रो झाला नसता आणि स्टोक्सची दुसरी धाव नेहमीसारखी झाली असती तर हा सामना टाय न होता इंग्लंडने गमावला असता.

क्रिकेटसंदर्भात जी काही अघोषित  आचारसंहिता आहे किंवा सद्वर्तनाचे संकेत आहेत त्यानुसार क्षेत्ररक्षकाने धाव वाचविण्यासाठी व फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न म्हणून यष्ट्यांच्या दिशेने चेंडू फेकला असेल आणि त्या मार्गात जर तो फलंदाजाला लागून इतरत्र गेला असेल तर सहसा कुणी धाव घेत नाही. पण जर तो चेंडू अडवता न आल्याने थेट सीमापार झाला असेल तर मात्र काहीच करता येत नाही आणि नियमानुसार तो चौकार ठरतो, ही या घटनेतील वस्तुस्थिती जेम्स अँडरसनने बीबीसीशी बोलताना स्पष्ट केली.

स्टोक्स भेटला होता पंचांना

तो म्हणाला की, माझ्या  माहितीनुसार सामन्यानंतर मायकेल वॉनशी बोलल्यानंतर स्टोक्स स्वतः पंचांकडे गेला होता आणि त्याने त्या ओव्हर थ्रोच्या चार धावा रद्द करण्याची पंचांना विनंती केली होती; परंतु नियमांत तशी काहीच तरतूद नसल्याने पंच हतबल ठरले होते, असे सांगताना अँडरसन म्हणाला की, जर चेंडू फलंदाजाला लागला असेल तर तो डेड बॉल ठरतो, अशीही चर्चा खेळाडूंमध्ये होती. स्वतः स्टोक्सने या प्रकाराबद्दल आयुष्यभरासाठी आपल्याला खेद राहील आणि या चार धावा म्हणजे ‘फ्ल्यूक’ होत्या, असे म्हटले होते.

पंचांचा निर्णय नियमांनुसारच- आयसीसी

दरम्यान, या विवादासंदर्भात आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेसुद्धा (आयसीसी)  अधिकृत वक्तव्य केले आहे. त्यानुसार पंचांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयासंदर्भात भाष्य करणे आयसीसीच्या धोरणात बसत नाही. आयसीसीच्या नियमपुस्तिकेच्या आधारेच मैदानातील पंचांनी योग्य तो अर्थ लावून निर्णय घेतलेला असेल, असे आयसीसीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.