विदेशी दारुचा साठा व्हॅनसह जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Liquor Seized

औरंगाबाद : विदेशी दारुचा साठा उतरवत असताना बुधवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी फुलंब्री तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी विदेशी दारुचे ४९९ बॉक्स जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी मैनाजी मोतीराम गुंजाळ (३६, रा. गुंजाळवाडी, ता. फुलंब्री), जुबेर अकबर पटेल (२६, रा. फुलंब्री) यांना पकडले. तर त्यांचा साथीदार सुनील काशीनाथ शेवाळे (रा. फुलंब्री) हा पसार झाला आहे.

विदेशी दारुचा साठा गुंजाळवाडी येथे रवाना झाला असून, पहाटे तीनच्या सुमारास उतरविला जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी छापा मारला. यावेळी एक जण ट्रकमधून बॉक्स उतरवून पिकअप व्हॅनमध्ये (एमएच-२०-डीई-४७७५) टाकत होता. पोलिसांनी धाव घेताच तेथून सुनील शेवाळेने पळ काढला. तर पोलिसांनी मैनाजी गुंजाळ व जुबेर पटेल यांना जागीच पकडले. यावेळी ट्रकमध्ये (एमएच-२०-एए-८९८८) ४६० तर पिकअप व्हॅनमध्ये ३९ बॉक्स आढळून आले.

याबाबत पोलिसांनी गुंजाळची चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की, वेंस कार्गो मुव्हर्स प्रा. लि. या ट्रान्सपोर्टच्या वतीने चिकलठाण्यातील अलाईड ब्लेंडर्स अ‍ॅण्ड डिस्टलरी या कंपनीतून दारु घेत सिल्लोड मार्गे जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील सुपर ट्रेडर्स येथे रिकामी करण्यासाठी वाहन दिले होते. मात्र, ठरवून दिलेल्या मार्गाने हे बॉक्स न नेता गुंजाळवाडीतील निर्जनस्थळी असलेल्या पाझर तलावाजवळ उतरविला. या दारुची लॉकडाऊनच्या काळात चढ्या भावाने विक्री करायची होती. त्यासाठी सुखलाल मनाजी जाधव (रा. वडारवाडा, ता. फुलंब्री) याने सुनील शेवाळेला पिकअप व्हॅन घेऊन पाठविले होते. त्यामुळे हे दारुचे बॉक्स गुंजाळवाडीत उतरविले जात होते. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत दारुचे बॉक्स, वाहने व मोबाईल जप्त केले.

याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, संदीप शेळके, जमादार विठ्ठल राख, संजय देवरे, अनिल चव्हाण, संजय भोसले, उमेश बकले, संजय तांदळे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला