शेअर बाजार सावरला; सूचकांकाची १६२७ ची उसळी

शेअर बाजार सावरला; सूचकांकाची १६२७ ची उसळी

stock-market

मुंबई : मागील दोन आठवड्यांपासून गटांगळ्या खाणारा शेअरचा सूचकांक १६२७ ने वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४८२ अंकांनी वधारला. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांनी ६.३२ लाख कोटींची कमाई केली.

सलग चार सत्रानंतर आज शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला. करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ‘करोना विशेष फंड’ सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. या घोषणेने गुंतवणूकदारांचे मनोबल उंचावले. त्याच वेळी कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये करोनाचे नवे रुग्ण आढळून न आल्याने करोनाची साथ आटोक्यात येण्याचे संकेत दिसत आहेत. आशियातील भांडवली बाजारात तेजी होती. आली. अमेरिकेच्या सिनेटने १ अब्ज अमेरिकी डॉलरच्या विशेष निधीचा प्रस्ताव दिला आहे. चीनमध्ये १ अब्ज युआनचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
आजच्या सत्रात निफ्टी आयटी निर्देशांकात ९.०३ टक्के, इन्फ्रा ६.९२ टक्के आणि मिडकॅप शेअर निर्देशांकात ५.५६ टक्के वाढ झाली. या तेजीने गुंतवणूकदारांची संपत्ती ६. ३२ लाख कोटींची वाढ झाली. दरम्यान मागील दोन सत्रात खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. खनिज तेलाच्या उत्पादनावरून निर्माण झालेला सौदी अरेबिया आणि रशियामधील तणाव निवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमतीत तेजी आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झाली. सेन्सेक्स १६२७ अंकांनी वधारला आणि २९९१५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४८२ अंकांनी वधारला आणि ८७४५ अंकांवर स्थिरावला.

गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ५८१.२८ अंकांनी घसरून २८,२८८.२३च्या पातळीवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९९.१० अंकांनी घसरून ८,२६९.७० च्या पातळीवर आला होता. बाजार उघडताच सेन्सेक्स १८०९ अंक खालच्या पातळीवर गेला होता. निफ्टी ४९०.५० अंकांनी घसरून ७,९७८.३० वर आला. या आठवड्यात सलग चौथ्या दिवशी घसरण सुरु होती. बुधवारी सेन्सेक्स १७०९ अंक घसरून २८,८६९ आणि ४२५.५५ अंकांनी घसरून निफ्टी ८,५४१.५०च्या पातळीवर होता.