…तरीही महाविकास आघाडी सरकार भक्कम, बिघाडी नाहीच – बाळासाहेब थोरात

CM Uddhav Thackeray & Balasaheb thorat

अहमदनगर :- शुक्रवारी पारनेर नगरपंचायतमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेना नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. मात्र याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला असता, “आघाडीत कुठलीही बिघाडी नाही” असा दावा त्यांनी केला आहे.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात शिवसेना नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. याबाबत बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला असता त्यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका केली. महाविकास आघाडी भक्कम आहे. सर्व मंत्री एकत्रितपणे काम करत आहेत. मात्र, काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची संधी शोधत आहेत. असे विधान त्यांनी संगमनेर तालुक्यातील शिपलापूर येथे दंडकारण्य अभियानाच्या उद्घाटनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना केले.

यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही उत्तरे दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली. या कर्जमाफीच्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. कारण तिथे आचारसंहिता सुरू होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा हप्ता देण्याची उपाययोजना करत आहोत. या कामात बऱ्याच अडचणी आहेत. पण अडचणीतून चांगला मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

कोरोना संकट आल्यानंतर राज्य शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली, ही वास्तविक स्थिती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करावाच लागतो. याशिवाय इतरही आवश्यक खर्च करावे लागतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे आवश्यक आहे, ते करावं लागत आहे. दुसरीकडे उत्पन्नात घट झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी शासन उपाययोजना करत आहे, असं थोरात म्हणाले. शिक्षण विभागाने मंत्र्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी गाडी खरेदीचा प्रस्ताव मांडला. प्रशासनाची कामे सुरू असताना गाड्यांची गरज भासते. प्रशासनातील प्रमुख लोकांना गाड्या लागत असतात. पण, याबाबत अपूर्ण बातमी चालली. सहा गाड्यांचा प्रस्ताव होता. त्यापैकी फक्त एकच गाडी मंजूर झाली, असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER