शास्त्री पुलावरून कोसळलेल्या कंटेनरचा चालक अजून बेपत्ता

Shastri Bridge

रत्नागिरी/ प्रतिनिधी : संगमेश्वर येथील शास्त्री पुलावरून शास्त्री नदीत कोसळलेल्या ट्रकच्या चालकाचा शोध आज बुधवारीही सुरू आहे. या गाडीत आणखी कोणी होते की नाही याची माहिती अजून मिळालेली नाही.

मंगळवारी रात्री झालेल्या या अपघातातील बेपत्ता चालकाचा शोध घेण्यासाठी देवरुखच्या राजू काकडे हेल्प अकॅडमीचे सदस्य जयवंत वाईरकर, नंदकिशोर (अण्णा) बेर्डे, सिद्धू वेल्हाळ, विशाल तळेकर , दीपक गेल्ये, दिलीप गुरव, बाळू आंबवकर, राजू  वनकुद्रे, मुकुंद वाजे, विनायक लिंबूकर प्रयत्न करत आहेत. काल रात्री १२ वाजेपर्यंत कंटेनर वर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र पाऊस भरपूर असल्याने ते शक्य झाले नाही; शिवाय दोन्ही बाजूंनी  वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे मग कंटेनर वर काढण्याचे प्रयत्न थांबवण्यात आले. आज सकाळी पुन्हा प्रयत्न करून हा कंटेनर बाहेर काढण्यात आला. अपघातग्रस्त कंटेनर राजस्थानचा असून, राजेश ललाणी यांच्या मालकीचा आहे. अर्थात अजूनही त्यांच्या कार्यालयाशी संपर्क झाला नसल्याने गाडीत अजून कोणी होते का, याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.