फूटबॉल पंचगिरीत स्टेफनी फ्रेपार्टने घडवला इतिहास

Stéphanie Frappart

स्टेफनी एफार्ट (Stéphanie Frappart) नावाची 36 वर्षीय फ्रेंच (France) महिला फूटबॉलमध्ये पंचगिरीबाबत (Referee) पुन्हा एक ऐतिहासिक कामगिरी बजावणार आहे. पुरुषांच्या चॕम्पियन्स लीग (Champions League) स्पर्धेत युवेंटस आणि डायनॕमो किव्ह संघादरम्यानच्या सामन्यात ती बुधवारी पंच असणार आहे, आणि चॕम्पियन्स लीग सामन्यात पंचगिरी करणारी पहिली महिला अशी तिची नोंद होणार आहे.

अशी ऐतिहासिक कामगिरी स्टेफनीसाठी काही नवीन नाही कारण गेल्यावर्षी युइएफ सुपर कपच्या अंतिम सामन्यातही ती पंच होती. यंदा आॕक्टोबरमध्ये युरोपा लीग स्पर्धेतही ती पंच होती. चॕम्पियन्स लीग ही युरोपातील सर्वात प्रतिष्ठेची फूटबॉल स्पर्धा मानली जाते आणि त्यात पहिल्यांदाच महिला रेफरी असणार आहे.

फ्रॕपार्ट ही वयाच्या 13 वर्षापासून पंचगिरी करत असून 2014 मध्ये तिने फ्रेंच सेकंड डिव्हिजनमध्ये पंचाची जबाबदारी पार पाडली होती आणि 2019 मध्ये ती लीग वन या फ्रान्समधील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धेतही ती पंच होती. युरोपमध्ये पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच असणारी ती पहिली महिला ठरली. सप्टेंबरमध्ये नेशन्स लीग स्पर्धेच्या माल्टा वि. लाटव्हिया या सामन्यात ती पंच होती. अलीकडेच तिने युरोपा लीगच्याही दोन सामन्यात पंचगिरी केली आहे.

फ्रॕपार्टच्या आधीसुध्दा फूटबॉल इतिहासात काही महिलांनी पुरुषांच्या सामन्यात पंचाची भूमिका बजावली आहे. त्यात निकोल पेटीनाट व बिबीयाना स्टेनहोस यांचा उल्लेख करावा लागेल. 2003 साली निकोल ही युईएफए कप स्पर्धेच्या सामन्यात पंच होती तर बिबीयाना ही बुंदेसलीगा स्पर्धेतील पहिली महिला पंच होती. त्यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळाला हा सन्मान व मोठी जबाबदारीसुध्दा असल्याचे स्टेफनीने म्हटले आहे. माझी कारकिर्द इतर मुलींना रेफ्री बनण्यासाठी प्रेरित करेल असेही तिने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER