मुक्काम पोस्ट लंडन 

Suvrat Joshi

दिल दोस्ती दुनियादारी (Dil Dosti Duniyadari) मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान त्याने निर्माण केलं मग पुढे नाटक , चित्रपट अश्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi) हा त्यांचा सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह असतो. त्यांचा फॅन्स ना तो सोशल मीडियाववरून अनेक गोष्टी नेहमी सांगत असतो. सुव्रत सध्या लंडन मध्ये आहे तो तिकडच्या अनेक गंमतीजमती आपल्या प्रेक्षकांना ना दाखवत असतो. मग कधीतरी लंडन मधला निसर्ग असू देत किंवा कधीतरी कॉफीची अनोखी गोष्ट. नुकतंच त्याने त्याचा सोशल मीडियावर एक खास विडिओ पोस्ट केला , या विडिओ मध्ये त्याचा एका खास गोष्टीच आकर्षण असल्याचं तो सांगतोय बघू या सुव्रत ला नेमकं कुठल्या गोष्टीचं आकर्षण आहे….

अभिनेता सुव्रत जोशी ने लंडन मधून एक खास गंमतीदार विडिओ शेयर केला तो म्हणतो ” एखाद्या झाडावरुन फळ पाडून खाण्याचे मला भयंकर आकर्षण आहे. मला निसर्गाचेच आकर्षण आहे म्हणा ना! भारतात वाढणाऱ्या शहरातत तुकड्यातुकड्याने वाटला गेलेला आणि कशीबशी स्वतःची जागा टिकवून ठेवणारा बापुडा निसर्ग माझे लक्ष अगदी सहज वेधून घेतो. या वर्षी इंग्लंड मध्ये फारच मोठा काळ राहायचा योग आला. इथे मात्र लंडन सारख्या अद्ययावत शहरामध्येही येथील लोकांनी निसर्ग टिकवून ठेवला आहे. तो असा इमारतींच्या चिमटीत सापडलेला, कसाबसा श्वास घेत तग धरून नसतो. तो शहराचा आत्मा असल्याप्रमाणे ताठ मानेने स्वतःच्या ऋतुचक्रात रमलेला असतो. शहरात अगदी मध्यवर्ती भागातही लोकांनी दारात फार काळजीने आणि प्रेमाने वाढवलेली फुलझाडे आणि फळझाडे आहेत. वसंतात आणि अगदी आषाढात देखील त्यांच्या त्यांच्या निसर्गक्रमाने ती फुलांनी तसेच फळांनी डवरतात. मध्यंतरी चालताना आमच्या घरापासून जवळच सखी आणि मी एका दारात चेरीनी लगडलेले एक झाड पाहिले. आमच्या तोंडाला पाणी सुटले आणि झाडावरुन फळं पाडून खाण्याच्या आदिम इच्छेने आम्हाला पछाडले. घराचे लोखंडी दार बंद होते.

त्यावरून उडी टाकून,चोरून आत शिरावे आणि त्या चेऱ्यांचा फज्जा उडवावा असा विचारही आला पण मग वयाने आणि शहरी सभ्यतेने जड केलेल्या मनानेच ती इच्छा दाबून टाकली. (तसे काही वेळा अनावर होऊन आम्ही रस्त्यावरील दुर्लक्षित कोपऱ्यावर फुललेल्या काही फुलांना स्थलांतरित करून आमच्या शयनकक्षेत मानाचे स्थान दिले आहेच म्हणा) पण मग अनेक ठिकाणी सफरचंद आणि पेर यांनी लगडलेली अनेक झाडे आम्हाला दिसू लागली. गेल्या आठवड्यात इथे इंग्लंड मधील गावाकडे थेम्सच्या किनारी नदीच्या मध्यात असलेल्या एक छोट्या बेटावर ‘पेर’ नी लगडलेले एक झाड आम्ही पाहिले. नाव आली की तिला वाट करून द्यायला दुभंगणारा एक पूल त्या बेटापर्यंत जात होता. आम्ही बिनधास्त त्यावरून त्या झाडाकडे गेलो पण बरीचशी फळे तेव्हा कच्ची होती. काल संध्याकाळी मी तिथे गेलो तेव्हा तो पूल दुभंगलेला होता आणि त्या कालव्यातून एक चष्मा घातलेली एक मध्यमवयीन स्त्री तिचे छोटे जहाज पार करून नेत होती. तिचा दहा बारा वर्षाचा मुलगा अतिशय हुशारीने ते दार उघडणाऱ्या यंत्र चालवत होता.

मी तिथे गेल्यावर “तुम्हाला पलिकडे बेटावर जायचे आहे का?” असे चटपटीत पणे त्याने विचारले. मी “हो” असे म्हटल्यावर “तुमची नाव तिथे आहे का?” असा प्रतिप्रश्न त्याने केला. “नाही,मला त्या पेर च्या झाडाकडे जायचे आहे” मी त्याचे शंकानिरसन केले. “येतोस का? दोघे मिळून फळं पाडू” असा मैत्रीवजा प्रस्ताव मी त्याला केला,त्यावर “आई चिडेल” असे एक अत्यंत सवयीचे उत्तर मला त्याच्या तोंडातून ऐकू आले. आई पुढे नाव घेऊन थांबली होती. मग मी पुलावरून पलीकडे त्या झाडाकडे गेलो. आता ती फळं पिकली होती. पाठीवर पिशवी लटकावलेले हे माकड वगळता त्यांना दुसरा कोणीही वाली (अथवा सुग्रीव) नव्हता. झाड गदागदा हलवून दहा एक फळं पाडली. सखीची खूप आठवण आली. ही फळं पिकली होती, ती चाखायला तीने इथे असायला हवे होती. पण ती पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला निसर्ग चिमटीत पकडून उभ्या असलेल्या शहरात विषाणूच्या भीतीने घरात चोरून बसली होती.

अचानक त्या बेटापलीकडे आणि हे छोटे बेट ज्या बेटावर त्याही बेटापलीकडे चालू असलेल्या भयानक गोष्टींनी मन उदास झाले. यापुढे आता शांतता हवी तर असे बेटावरच पळून जावे लागणार असे काहीसे वाटून गेले. आपल्या देशात  धगधगते आहे आणि आपण इथे असे शांत आहोत याबद्दल अपराधभाव दाटून आला. फळं फार मधुर होती. काही क्षण सगळं विसरायला लावणारी गुंगी आणण्याचे सामर्थ्य त्यात होते. मर्ढेकरांसारखे मलाही काही वाटून गेले.” त्यांच्या या भल्या मोठ्या पोस्ट वरून त्याने लंडन मधलं वातावरण आणि तिकडची गंमत हे सगळंच मांडल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER